मुंबई ः संत परंपरा ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासाची जिवंत ओळख आहे. ज्ञान, भक्ती, सेवा आणि समानतेचे तत्त्वज्ञान घेऊन, ही परंपरा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचेही प्रभावी माध्यम ठरली आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायावर आधारित राज्यात नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. रामटेकचे माजी कुलसचिव डॉ. राम जोशी यांनी हा अभ्यासक्रम, शासनमान्यता आणि निधीसह राबवण्याची जोरदार मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील संतांनी समाज परिवर्तनासाठी मोठे कार्य केले आहे. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ अशा संतांनी जातपात, अंधश्रद्धा, विषमता या सामाजिक दु:खांवर आपल्या अभंग, गाथा आणि प्रवचनांतून घणाघाती प्रहार केला. या महाराष्ट्रातील संत परंपरेचा वारसा शैक्षणिक चौकटीतून पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने वारकरी संप्रदायावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आता हालचाली होत आहेत.
आजच्या डिजिटल युगात तरुण पिढीपासून ही परंपरा दूर जाते की काय अशी भयावह स्थिती आहे. म्हणूनच, संत साहित्य, कीर्तन-प्रवचन-भजन कला, वारकरी जीवनशैली यांचा अभ्यासक्रम तयार करून शिक्षणपद्धतीत समाविष्ट करण्याची गरज अधोरेखित करत यावर अभ्यासक्रम तयार केला आहे. राज्याच्या संत परंपरेचा सांस्कृतिक वारसा शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीमध्ये रुजवण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो. आषाढी एकादशीपूर्वी या संदर्भात सरकारने विचार करण्याची डॉ. जोशी यांची आग्रही मागणी आहे.
हा अभ्यासक्रम प्राथमिक शिक्षणापासून पदविका, पदवी आणि पदव्युत्तर स्तरांपर्यंत राबवता येईल, अशी संरचना सुचविण्यात आली आहे. त्यामध्ये निवडक अभंग, संत वाङ्मय, गाथा, वारकरी परंपरेतील कीर्तन, प्रवचन, भजनकला यांचा अनुभवाधिष्ठित अभ्यास, तसेच संस्कृत आणि मराठी साहित्याचे स्पष्टीकरण, विश्लेषण यांच्या अंतर्भावाचा विचार केला आहे. मला बोलवले तर या अभ्यासक्रमाची मांडणी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करेन, एकादशीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची घोषणा सरकारने करावी असा मनोदय डॉ. जोशी यांनी व्यक्त केला आहे.
या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजना, अभ्यास साहित्यासाठी अनुदान, निवासी शिबिरे आणि शिक्षक प्रशिक्षण योजनेसह अनेक धोरणात्मक बाबी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती ते शिक्षण सहाय्य प्रशिक्षणासाठी कार्यशाळा, मॉड्यूल तयार करणे, शिक्षक सन्मान योजना, मूल्याधिष्ठित शिक्षण इत्यादी बाबींना प्राधान्य दिल्यास सरकारचा हा निर्णय क्रांतीकारक ठरेल.
संस्कृत विद्यापीठ या अभ्यासक्रमाला जोडल्यास, हा अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवरही राबवता येईल आणि त्याला राष्ट्रीय संस्कृत संस्था किंवा केंद्रीय अनुदान योजनांतून आर्थिक पाठबळ मिळू शकेल, असा महत्त्वपूर्ण मुद्दा या प्रस्तावात मांडण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने एक पाऊल पुढे टाकून ही संधी साधावी, असा सूर या मागणीतून उमटतो आहे.
निवडक अभंग, संत वाङ्मय, गाथा यांचा अभ्यास, वारकरी जीवनशैली, कीर्तन-भजन प्रशिक्षण, तसेच संस्कृत आणि मराठी साहित्याची मांडणी आणि स्पष्टीकरण समाविष्ट असावे अशी मांडणी आहे. यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार यांचा अनुभव उपयोगात आणून, अनुभवाधिष्ठित शिक्षणास प्राधान्य दिले आहे.
वारकरी संप्रदाय केवळ भक्तीचा नव्हे, तर समतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा आहे. अनेक विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही ते भजन, कीर्तन, प्रवचन यात नैपुण्य मिळवतात. हे कौशल्य प्रमाणित करून, त्यांना शिक्षणातील समकक्ष दर्जा देण्याचाही विचार करावा.