Vishnunagar hill slope danger : ‘माळीण’ होण्याची वाट बघत आहात का ?
मुंबई : प्रसाद जाधव
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 148 मधील विष्णूनगरच्या डोंगरउतारावर शेकडो कुटुंबे 30 ते 40 वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत राहात आहेत. पावसाळ्यातील प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी संकट असतो. डोंगराच्या पायथ्याशी अडीच ते तीन हजार झोपड्या. कधी डोंगर खाली येऊन होत्याचे नव्हते होईल सांगता येत नाही. त्यामुळे ‘माळीण’ होण्याची वाट बघत आहात का, असा आर्त सवाल येथील रहिवाशांनी प्रशासनाला केला आहे. तत्काळ पुनर्वसन व्हावे, अशी रास्त अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.
डोंगरउतारावर भीम टोला, गणेश चाळ, मास्तर चाळ असून या ठिकाणी 500 ते 600 कुटुंबे राहतात, तर पायथ्याशी अडीच ते तीन हजारांच्या आसपास झोपडपट्टी आहे. येथील बहुतांश लोक मागासवर्गीय वंचित समाजातील आहेत. उत्तर भारतीयांची संख्यादेखील मोठी आहे.
चेंबूरमध्ये बीपीसीएल, एचपीसीएल, टाटा पॉवर, एजिस केमिकल, आरसीएफ यांसारख्या तेल कंपन्या असल्याने कंत्राट पद्धतीने हजारो कामगारांची गरज भासते. त्यामुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून या ठिकाणी कामगार येत असतात. मात्र घरांच्या किमती जास्त असल्यामुळे भाड्याने घर घेणेदेखील परवडत नाही. त्यामुळे या लोकांनी डोंगरमाथ्यावर मोकळ्या जागेवर झोपड्या उभारून निवार्याची व्यवस्था केली.
येथील लोकांचे जीवनमान कसरतीचे तर आहेच, पण पावसाळ्यात जीवघेणेदेखील बनते. कधी कोणती दरड घराच्या छतावर कोसळेल याचा नेम नाही. प्रत्येक वर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. छतावरील सिमेंटच्या पत्र्याचे नुकसान होत आहे. नवीन सिमेंटचे पत्रे टाकण्यासाठी पैसे नसल्याने साधे प्लास्टिक टाकून, तर अनेकदा उघड्यावरच राहावे लागत आहे. याठिकाणी राहणे म्हणजे मृत्यूला उशाशी बाळगून ठेवण्यासारखे आहे.
डोंगरउतारावरील झोपड्यांना कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी किंवा प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या इमारतीत घरे दिली तर पायथ्याशी असलेल्या झोपड्यादेखील सुरक्षित राहतील. नाहीतर कधीतरी ‘माळीण’सारखी एखादी दुर्घटना घडून होत्याचे नव्हते होईल. डोंगरावर राहात असल्यामुळे एसआरए प्रकल्प राबविता येत नाही. पावसाळ्यात पुरेशी झोपदेखील मिळत नाही. शासनाने आम्हाला हक्काचे घर द्यावे, अशी मागणी रहिवासी दीपक कांबळे यांनी केली आहे.
पावसाळ्यात येथील लोक जीव मुठीत घेऊन राहतात. जगण्यासाठी दररोज मरण यातना सहन करत आहोत. सुरक्षित ठिकाणी घर घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही. येथे राहणारे श्रमिक आहेत. शासनाने त्यांच्याबाबतीत ठोस निर्णय घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे.
हिरप्पा खाजिर, शाखाप्रमुख, शिवसेना शिंदे गट
दरड कोसळण्याच्या घटना केवळ पावसाळ्यात नाही, तर इतर वेळीही घडत असतात. घराचे नुकसान होत असते. मुलाबाळांसह जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. आमची कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करावी.
शिवाजी धोत्रे, रहिवासी

