

मुंबई : विक्रोळी रेल्वे उड्डाण पुलामुळे विक्रोळी पूर्व-पश्चिम प्रवासामध्ये अर्ध्या तासाची बचत होत आहे. तर दुसरीकडे घाटकोपर ते कांजूरमार्ग दरम्यान एलबीएस मार्गावर होणारी वाहतूक कोंडीही सुटली आहे. त्यामुळे त्रासदायक होणारा हा प्रवास विक्रोळीकरांसाठी आता सुखकर झाला आहे.
एलबीएस मार्गावर कांजूरमार्ग येथील रेल्वे मार्गावरून जाणारा उड्डाणपूल सोडल्यानंतर थेट घाटकोपर येथे पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल होता. त्यामुळे कांजूरमार्ग ते घाटकोपर दरम्यान एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 2012 मध्ये विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळ पूर्व- पश्चिम जोडणारा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. विक्रोळी रेल्वे फाटक बंद करून 2018 पासून पूर्व-पश्चिम जोडणार्या पुलाचे काम सुरू झाले. 1 ऑक्टोबर 2020 पर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण हे काम तब्बल पाच वर्षे म्हणजे 2025 पर्यंत लांबले. अखेर 14 जूनला उद्घाटनाविना हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
विक्रोळी पूर्व-पश्चिम जाण्यासाठी पूर्वी कांजूरमार्ग व घाटकोपर उड्डाणपुलाचा वापर केला जात होता. त्यामुळेच विक्रोळी कन्नमवार नगर व विक्रोळी पूर्वेकडील भागात जाण्यासाठी विक्रोळी पश्चिम येथून किमान 35 ते 40 मिनिटांचा कालावधी लागत होता. वाहतूक कोंडीचाही त्रास सहन करावा लागत होता. आता विक्रोळी पूर्व-पश्चिम अवघ्या पाच मिनिटांत जाता येते. एवढेच नाही तर घाटकोपर व कांजूरमार्ग रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीही कमी झाली आहे. पवईमार्गे कांजूरमार्ग उड्डाण पुलावरून पूर्वेला जाणारे वाहन चालक विक्रोळी उड्डाणपुलाचा वापर करू लागले आहेत.
अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे अंधेरीकरांचाही प्रवास जलद होऊ लागला आहे. पूर्वी गोखले पुलाच्या कामामुळे अंधेरी पूर्व व पश्चिमेला होणार्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका झाली आहे. गोखले पुलामुळे पार्ले बिस्कीट कंपनीजवळ असलेल्या पुलाचाही वापर आता कमी झाला असून या पुलावरील वाहतूकही पूर्वीप्रमाणे सुरळीत झाली आहे.