

Maharashtra Politics : "ठाकरे बंधूंनी त्यांच्या विजयी मेळाव्याला काँग्रेसला का बोलावले नाही, याची चिंता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) यांनी करू नये. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येत असल्याने त्यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी," अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी भाजपवर निशाणा साधला. ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाने सत्ताधाीर पक्षांच्या पोटात दुखू लागले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी मुंबईत एकाच व्यासपीठावर आले. या ऐतिहासिक मेळाव्याला महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचा कोणताही नेता उपस्थित नव्हता. याच मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाच विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याने महाराष्ट्रात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही एकजूट पाहून विरोधकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच ते आता महाविकास आघाडीत फूट पाडण्याच्या उद्देशाने काँग्रेसला का बोलावले नाही, असे निरर्थक प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु, त्यांनी आमची चिंता करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली. ते म्हणाले, "मी आज काँग्रेसचा नेता असलो, तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतच झाली. मी आज राजकारणात जे काही आहे, ते केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे. बाळासाहेबांनी राजकारणात कधीही जात आणि धर्म पाहिला नाही, त्यांनी केवळ मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला महत्त्व दिले."