

मुंबई : डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवार राष्ट्रवादीने घेतल्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट या मित्रपक्षांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच आहे, अशी टीका काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीकडे ठाकरे गटाने पाठ फिरवल्यामुळे राज्यातील आघाडीत फूट पडली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी रात्री, शरद पवार राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडून शरद पवार यांच्यावर जोरदार टीकेला सुरुवात झाली. पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे. शरद पवारांचे वय ८६ आहे. संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचाराला धरून घालवले. अशा नेत्याकडून जातीयवादी, धर्मांध शक्तींशी हातमिळवणी होईल, असे कधीच वाटले नव्हते; पण पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच आहे. हे महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे, असे काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी पक्ष केवळ सत्तेसाठी बनला आहे. सत्तेशिवाय जगणे या पक्षाला मान्यच नाही. सत्तेसाठी जन्माला आले, सत्तेसाठी मरायचे एवढेच यांच्या डोक्यात आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय बाप-लेकीने घरातच घेतला आहे. सुप्रिया सुळे यांना सत्तेत सहभागी होऊन मंत्री व्हायचे आहे. १० आमदारांच्या बळावर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्रिपद मागणे हास्यास्पद आहे. शिवसेनेकडे ६० आमदार असताना शिंदेंना भाजपने मुख्यमंत्रिपद दिलेले नाही. मग १० आमदारांवर सुप्रिया सुळेंना देणार का, असा सवाल त्यांनी केला.
‘राष्ट्रवादी’ची देशाशीही गद्दारी : खा. प्रणिती शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केल्यास ती केवळ काँग्रेस किंवा ‘इंडिया’ आघाडीशीच नव्हे, तर देशाशीही केलेली गद्दारी असेल, अशी घणाघाती टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. मात्र या मुद्द्यावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वेगळी भूमिका मांडली. डिलिमिटेशन सर्वसंमतीने झाले असते तर अधिक चांगले झाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हे पवारांचे जंतरमंतर : राज ठाकरे
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार हल्ला चढवला आहे. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर केलेल्या विधानाची आता पुन्हा आठवण करून देत त्यांनी शरद पवारांच्या राजकीय रणनीतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ‘हे पवारांचे जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळते’, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आपण केलेले भाकीत आता खरे ठरत आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, २ जुलै २०२३ रोजी जेव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती, त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्षे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी योग्य भांडणाचे नाटक केले आणि मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकरे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणालो होतो की, हे पवारांचे जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळते.
शरद पवारांच्या पाठिंब्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मौन
बारामती : मतदारसंघ पुनर्रचना विधेयक बाबत आम्ही ‘एनडीए’सोबत आहोत, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या मुद्द्यावर ‘एनडीए’ला समर्थन देत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर ‘एनडीए’च्या प्रस्तावाला समर्थन दिले जाईल अशी चिन्हे आहेत, यासंबंधीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. त्यामुळे त्यांच्या या मौनाचीही चर्चा सुरू झाली आहे.
पवार भाजपच्या कुटिल डावात फसणार नाहीत : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
डिलिमिटेशन विधेयक हे राष्ट्रविरोधी असून लोकशाहीची थट्टा करणारे आहे. हे विधेयक पास झाले तर देशात प्रादेशिक असमतोल होऊन अराजक माजेल. शरद पवार यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास शिव, शाहू, फुले व आंबेडकर विचारांचा राहिला आहे. ते भाजपच्या कुटिल डावात अडकणार नाहीत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. ८५ व्या वर्षी शरद पवार यांना राज्यसभेवर खासदार होण्यासाठी राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता. केवळ शरद पवार गटाचे १० आमदार असताना ही जागा दिली, असे काँग्रेसने म्हटले आहे.
हा महाराष्ट्रद्रोह.., शरद पवार गटाला महाराष्ट्र काय हे दाखवून देऊ : खा. राऊत
महाबळेश्वर : लोकसभेत यापूर्वी प्रचंड मताधिक्याने पराभूत झालेले डिलिमिटेशन विधेयक पुन्हा अमित शहा आणत असतील आणि त्यासाठी घोडेबाजार केला जात असेल, तर ही लोकशाहीची अखेरची घंटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला असेल, तर तो पक्षाच्या विचारधारेसाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दुर्दैवी निर्णय आहे. अशा पक्षाने यापुढे फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये, महाराष्ट्र काय आहे हे शरद पवार गटाला दाखवून देऊ. महाराष्ट्रद्रोह केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला महाराष्ट्र माफ करणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. राऊत म्हणाले, आमचे सहा खासदार फोडले म्हणून आम्ही अमित शहांच्या पायाशी गेलो नाही. आमची माणसेही ५०-५० कोटींना विकली गेली, आमदार-खासदार गेले; पण पक्षाचा संघर्ष थांबला नाही. आम्ही लढत राहिलो; पण हा महाराष्ट्रद्रोह आहे, असे राऊत म्हणाले. पक्ष फुटण्यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. शिरूर, कोल्हापूरसह अनेक मतदारसंघांत शिवसेनेचा प्रभाव असून आम्ही लढून त्या जागा जिंकून आणल्या आहेत. आता त्या जागा कशा जिंकून आणता ते पाहू, असे आव्हान त्यांनी खा. अमोल कोल्हे यांना दिले.