

मुंबई: देशातील एक सर्वोत्तम फिरकीपटू राहिलेले मुंबईचे ज्येष्ठ रणजीपटू पद्माकर काशिनाथ शिवलकर यांचे सोमवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. आपल्या जादुई डावखुर्या फिरकीने त्यांनी मुंबई रणजी संघासाठी 589 विकेट घेतल्या. त्यांचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे.
पद्माकर शिवलकर हे ‘पॅडी शिवलकर’ म्हणून प्रसिद्ध होते. 22व्या वर्षी त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1961-62 ते 1987-88 या कालावधीत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी 124 सामन्यांमध्ये 19.69च्या सरासरीने 589 विकेट घेतल्या. हा विक्रम अद्याप कुणीही मोडलेला नाही. तब्बल 42वेळा त्यांनी पाचहून अधिक तर 13 वेळा दहाहून अधिक विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, 515 धावा आणि 63 झेल त्यांच्या नावावर आहेत. 50व्या वर्षी ते क्रिकेटमधून निवृत्त झाले. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील एक यशस्वी फिरकीपटू असूनही शिवलकर यांची भारताच्या कसोटी संघात निवड झाली नाही.
क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्माकर शिवलकर यांना 2017 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोहळ्यातही शिवलकर यांचा सन्मान करण्यात आला होता.
पद्माकर शिवलकर यांनी लिहिलेले ‘हा चेंडू दैवगतीचा’ हे पुस्तक 2019मध्ये प्रकाशित झाले. डिंपल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात त्यांनी क्रिकेटमधील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
पॅडी शिवलकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. शिवलकर यांनी अनेक दिग्गज फलंदाजांना बाद केले होते. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील एक तारा निखळला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली.
मुंबई क्रिकेट असोसिएशचे अध्यक्ष (एमसीए) अजिंक्य नाईक यांनी श्रद्धांजली वाहताना, शिवलकर हे केवळ मुंबई नव्हे तर भारतातील महान फिरकीपटू होते. त्यांची खेळाप्रति निष्ठा आणि अमुल्य योगदान युवा पिढीसाठी कायम मार्गदर्शक असेल, असे म्हटले.