

मुंबई : मालवणी भाषेला जगाच्या पटलावर आणणारे जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि.२८) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) दहिसर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गंगाराम गवाणकर यांच्या तब्येतीत चढ-उतार सुरू होते, दहिसर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गवाणकर हे त्यांच्या 'वस्त्रहरण' या नाटकामुळे प्रसिद्धीस आले. या नाटकाने मालवणी बोलीभाषेला मराठी रंगभूमीवर एक खास ओळख दिली. त्यांनी 'जगर' (१९९८) या मराठी चित्रपटासाठी पटकथा लिहिली होती. जगभरात गाजलेले वस्त्रहरण नाटकाखेरीज गव्हाणकर यांनी वात्रट मेले, वन रूम किचन, दोघी, वर भेटू नका यासारखी २० हुन अधिक नाटके लिहली. मात्र, त्यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण नाटकानंतर मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या विशेषतः मालवणी बोलीतील नाटकांचा उदय झाला. त्यांना 'मानाचि संघटने'चा लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार मिळाला होता.