

Marathi actress Jyoti Chandekar passes away
मुंबई : चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीत कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (वय ६९) यांचे शनिवारी (दि.१६) दुपारी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या आई होत.
ज्योती चांदेकर यांची 'सध्या ठरलं तर मग' ही मालिका सुरू होती. परंतु तब्येतीच्या कारणास्तव त्यांचे डायलिसिसही सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटर वर होत्या. उपचारांना प्रतिसाद नसल्याने त्यांचे अवयव निकामी होत गेले. त्यातच त्यांची आज दुपारी साडेचारच्या सुमारास प्राणज्योत मालवली.
"ठरलं तर मग" मालिकेतील ‘पूर्णा आजी’ या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहचल्या. त्यांनी गुरू (२०१६), ढोलकी (२०१५), तिचा उंबरठा, पाऊलवाट (२०११), मी सिंधुताई सपकाळ (२०१०), सलाम, सांजपर्व या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांनी अभिनय केलेल्या मराठी मालिका "छत्रीवाली", "तू सौभाग्यवती हो" यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली.
आमच्या मालिकेतील सर्व कलाकारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे प्रतिक्रिया अभिनेत्री जुई गडकरी यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना दिली.