मुंबई : हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी मंगळवारी रात्रीपासून अप व डाऊन मार्गावर रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पहिल्याच दिवशी प्रवाशांची गैरसोय झाली. या कालावधीत वाशी ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मंगळवार ते शुक्रवार 8 ऑगस्टपर्यंत दररोज रात्री 10.45 ते पहाटे 3.45 या वेळेत हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान काही गाड्या ठरावीक स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. बेलापूरहून रात्री 8.54 वाजता सुटणारी बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशीपर्यंतच धावेल, तर रात्री 9.16ची बेलापूर-सीएसएमटी लोकलने वडाळा रोडपर्यंतच सेवा दिली जाणार आहे.
वांद्रे-सीएसएमटी लोकल रात्री 10 वाजता सुरू होऊन वडाळा रोडवरच थांबवण्यात येणार पनवेलहून रात्री 10.55 आणि 11.32 वाजता सुटणार्या पनवेल-वाशी लोकल सेवा नेरूळपर्यंतच चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मंगळवारी सेवा सुरू होती, मात्र लोकल उशिरा धावत होत्या.
प्लॅटफॉर्मवर काहीसा गोंधळ
या रात्रकालीन ब्लॉकची अनेक चाकरमान्यांना कल्पना नसल्यामुळे हार्बरमार्गावरील पनवेलकडे जाणार्या प्लॅटफॉर्मवर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. त्यात लोकल उशिरा येत असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. उशिरा गाड्या धावत होत्या. रात्री उशिरा वाहन व्यवस्था नसल्यामुळे अनेक प्रवासी मिळेल त्या खासगी वाहनाने घरी परतले.
वाशीतून या लोकलसेवा रद्द
हार्बर मार्गावरील ब्लॉकदरम्यान वाशी स्थानकातून पहाटे 4.03, 4.15, 4.25, 4.37, 4.50 आणि 5.04 वाजता सुटणार्या अप लोकलसेवा रद्द केल्या आहेत.
सीएसएमटी स्थानकातून रात्री 9.50, 10.14 आणि 10.30 वाजता सुटणार्या डाऊन लोकल सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत.
वडाळा रोडवरून पहाटे 5.06 आणि 5.52 ची पनवेल लोकल, पहाटे 4.52 आणि 5.30ची सीएसएमटी-पनवेल लोकल नेरुळ स्थानकातून चालविण्यात येणार आहे. सीएसएमटीवरून पहाटे 5.10 वाजता सुटणारी गोरेगाव लोकल वडाळा रोडवरून सुटणार आहे.