

कोपरखैरणे : वाशी सेक्टर 17 परिसरात दिवस- रात्र वर्दळ असते. मात्र अशा ठिकाणी मुख्य रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीची काच फोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने रोकड आणि लॅपटॉप असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पलावा येथे राहणारे सद्दाम हुसेन हे काही कामानिमित्त 23 ऑगस्टला नवी मुंबईत आले होते. त्यांनी त्यांची कार वाशी सेक्टर 17 येथील टायटन घड्याळाच्या दुकानासमोर पार्क केली. या रस्त्यावर रात्रीही बर्यापैकी वर्दळ असते. रात्री साडेदहा वाजता त्यांनी गाडी पार्क केली आणि तासभरात आपले काम आटोपून ते निघाले.
गाडीजवळ आले असता गाडीच्या खिडकीची काच फुटलेली दिसली. आतील अडीच लाखांची रोकड व त्यांच्या सहकार्याचा लॅपटॉप ठेवलेल्या दोन्ही बॅगा चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याच बॅगेत रोकड, पारपत्र व अन्य महत्वाची कागदपत्रे ठेवली होती.
याबाबत त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.