मुंबई : बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चार वर्षांनंतर आता पुन्हा वनराणीची सफर बच्चे कंपनीसह पर्यटकांना अनुभवता येणार आहे. ही मिनी टॉय ट्रेन ऑगस्टमध्ये सेवेत दाखल होणार आहे.
मे २०२१ मधील तौक्ते चक्रीवादळात ही टॉय ट्रेन बंद पडली होती. आता तिचे काम पूर्ण झाले असून नुकतीच चाचणी घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाल्याने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चार महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी नॅशनल पार्कमधील विविध सेवा सुविधांचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी वनराणी ट्रेनची सफर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. कंत्राटदाराला धारेवर धरून जुलै महिन्यांत सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे कंत्राटदार आणि वन विभागाने युद्ध पातळीवर काम करून ही सेवा आता ऑगस्ट महिन्यांत सुरू करण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली, अनेक रस्ते उखडले गेले. त्यावेळी वनराणीच्या २.३ किमी लांबीच्या वळणदार मार्गावर झाडे पडल्याने रुळांसह स्टेशनचेही प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हापासून वनराणीची धाव बंद झाली होती. ती नव्याने सुरू करण्यासाठी २.३ किमीचा रेल्वे मार्ग पूर्णतः नव्याने बांधावा लागला आहे. पाच वर्षांनी वनराणी पुन्हा नव्याने पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.