Uttan Virar coastal road
प्रस्तावित उत्तन- विरार मार्गpudhari photo

Uttan Virar coastal road : प्रस्तावित उत्तन-विरार सागरी मार्ग वाढवण बंदर आणि ‘समृद्धी’ला जोडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना , ‘एमएमआरडीए’कडून सुधारित आराखडा सादर
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्तन-विरार सागरी मार्गाचा सुधारित आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. यावेळी, प्रस्तावित उत्तन- विरार मार्ग वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावे. त्यामुळे हा सागरी मार्ग प्रकल्प मुंबईला महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधान भवनातील मंत्रिमंडळ कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी प्रस्तावित उत्तन-विरार सागरी मार्ग प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विधान भवनातील या आढावा बैठकीत सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन करत वेगवेगळ्या सहा प्रस्तावांचे सादरीकरण केले. यात आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य आणि पर्यावरणपूरक अशा 52 हजार 652 कोटी रुपयांच्या पर्यायाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निवड केली. या पर्यायामुळे प्रकल्प खर्च 87 हजार कोटींवरून 52 हजार कोटींपर्यंत खाली आणण्यात यश आले.

सुरुवातीचा प्रस्तावित आठ पदरी मार्गाचे डिझाईन बदलून सहा पदरी अधिक आपत्कालीन मार्ग करण्यात आले. शिवाय, आपत्कालीन मार्गही चार पदरी ठेवण्यात आले. त्याने खर्च कमी झाला. शिवाय, रचना आणि लेनची रुंदी कमी केल्यामुळे ‘राईट ऑफ वे’ म्हणजेच आवश्यक जागेची लांबी कमी झाली. त्यामुळे जमीन विकत घेण्याचा आणि प्रकल्पबाधितांवर होणारा खर्च बराच कमी झाला. तसेच, पूर्वी दोन खांबांवर असलेली कनेक्टर्स पुलांची रचना बदलून एका खांबावरील करण्यात आली. त्यामुळे बांधकाम स्वस्त आणि पर्यावरणपूरक बनले. तसेच, तात्पुरते खर्च, सल्लागार फी आणि सुरुवातीचे इतर खर्च कमी, त्यामुळे एकूण खर्चात मोठी बचत झाली.

मुंबईच्या उत्तर उपनगरांमधून थेट वाढवण बंदर दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि उत्तर मुंबईच्या उपनगरांना थेट जोडणारा हा प्रकल्प नवीन आर्थिक संधी व कनेक्टिव्हिटीचा व्यापक विस्तार करणारा आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) तयार करावे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, या अनुषंगाने एमएमआरडीएला सुधारित अद्ययावत तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल (पीपीआर) शासनाला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

असा आहे प्रकल्प

  • एकूण लांबी : 55.12 किमी

  • मुख्य सागरी मार्ग: 24.35 किमी

  • कनेक्टर्स: 30.77 किमी

  • उत्तन कनेक्टर (9.32 किमी) - मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोडशी जोड

  • वसई कनेक्टर (2.5 किमी) - पूर्णपणे उन्नत

  • विरार कनेक्टर (18.95 किमी)- वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेला जोडणार

प्रकल्पाला रक्कम कशी मिळणार

  • 37,998 कोटी (72.17%) - जायका/ बहुपक्षीय निधीकडून प्रस्तावित (टोलवसुलीच्या आधारे परतफेड)

  • 14,654 कोटी (27.83%) - महाराष्ट्र सरकार/एमएमआरडीएकडून भांडवली (इक्विटी) स्वरुपात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news