

मुंबई : एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी समर्पित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) ही संस्था प्रमुख मापदंड बनण्याच्या मार्गावर असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी येथे काढले.
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक पातळीवर भारत चमकावा अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली आहे. तोच धागा पकडून वैष्णव म्हणाले, तंत्रज्ञान, व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम ज्या प्रकारे मापदंड बनले आहेत त्याचप्रमाणे आयआयसीटी या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे. वेव्हज 2025 च्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आलेल्या घोषणेला येथे सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी औपचारिक रूप दिले.
आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी अभ्यासक्रम विकास, इंटर्नशिप, शिष्यवृत्ती, स्टार्टअपना निधीपुरवठा आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी आयआयसीटीसोबत भागीदारी करण्यास सहमती दर्शवल्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.
या सत्रादरम्यान, आयआयसीटी आणि आघाडीच्या उद्योग भागीदारांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी इरादा पत्रांचे आदानप्रदान करून दीर्घकालीन सहयोगाचा आरंभ केला. दीर्घकालीन सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करणार्या कंपन्यांमध्ये जिओ स्टार, ऍडॉब, गुगल आणि यूट्यूब, मेटा, वायकॉम, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीआयडीआयए यांचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा हे करारांच्या आदानप्रदान प्रसंगी उपस्थित होते.
या समारंभात उपस्थित असलेल्या उद्योजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक मीडिया अँड एंटरटेनमेंट, एनव्हिडीया), संजोग गुप्ता (सीईओ, स्पोर्टस् अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेस, जिओ स्टार), माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक - एज्युकेशन, अॅडोब), प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्ष, गुगल इंडिया), राजीव मलिक (वरिष्ठ संचालक, वॅकॉम), संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुख, राज्य सरकार आणि आरोग्यसेवा), संदीप बांदीवडेकर (संचालक, मेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्स, मायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालक, सार्वजनिक धोरण, मेटा) यांचा समावेश होता.