

पुढारी ऑनलाईन डेस्क : पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमा अंतर्गत 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' (Champions of the Earth) हा पुरस्कार देऊन संशोधक आणि अभ्यासकांना सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांना जाहीर झाला आहे. 2005 पासून या पुरस्काराने 122 संशोधकांना त्यांच्या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी पर्यावरणीय नेतृत्वासाठी आणि कामासाठी गौरविले आहे. (United Nations Environment Programme)
यावर्षी माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांना त्यांच्या पर्यावरणीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. गाडगीळ मागील अनेक दशके संशोधन आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून लोक आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कार्याचा लोकमतावर आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठीच्या शासकीय धोरणांवर मोठा प्रभाव पडला आहे. भारताच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि जैवविविधतेचे केंद्र असलेल्या पश्चिम घाटावरील त्यांचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
ब्राझीलच्या सोनिया ग्वाजजारा, अमेरिकेतील अॅमी बाउर्स कॉर्डालिस, रोमानियाचे पर्यावरण रक्षक गॅब्रियल पॉन, चीनमधील शास्त्रज्ञ लू क्वी यांचे चीनमधील वाळवंटीकरण कमी करण्यात आणि पर्यावरणीय हानी कमी करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. इजिप्तमधील सेकेम यांना त्यांच्या समर्पित कार्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.