

मुंबई ः लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचे आहे, हे आपलेपण होते. मात्र, लोकसभेचे यश सगळ्यांच्या डोक्यात गेले. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. ती चूक पुन्हा करायची असेल, तर एकत्र येण्यात अर्थ नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचेच हे संकेत मानले जातात.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा विचार उद्धव यांनी यापूर्वीच बोलून दाखवला आहे. तसा निर्णय मात्र त्यांनी अद्याप जाहीर केलेला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंची युती होण्याची चर्चा, त्याचवेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचीही शक्यता अलीकडे वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मुखपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत उद्धव यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या वागण्याला आक्षेप घेतला.
लोकसभेला कमावले ते विधानसभेला गमावले. फक्त सहा महिन्यांत हे कसे घडले, या संजय राऊत यांच्या प्रश्नावर उद्धव यांनी, महाविकास आघाडीच्या पराभवाचे विश्लेषण करताना ईव्हीएम घोटाळा, मतदारयाद्या, बोगस मतदान, मतदारांची आणि मतदानाचीही अचानक वाढलेली संख्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘लाडकी बहीण’सारख्या फसव्या ठरलेल्या योजना याचा हा परिणाम असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी महाविकास आघाडीचे कुठे चुकले, यावर उद्धव यांनी बोट ठेवले आहे.
उद्धव म्हणतात, निवडणूक मोठी असली की, वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाला की, स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्यावेळी चार-चार, पाच-पाचवेळा जिंकलेले मतदारसंघ ‘आपल्याला जिंकायचेय’ म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळी (मात्र) शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू-तू, मै-मै झाले. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला.
लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले, तरी उमेदवार होते. विधानसभेला चिन्ह होते; पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कुणाला द्यायची, हे निश्चित नव्हते. ही चूक होती; ती पुढे सुधारली पाहिजे. ती चूक पुन्हा करायची असेल, तर एकत्र येण्याला अर्थ राहत नाही, असा इशाराच उद्धव यांनी महाविकास आघाडीतील आपल्या मित्रपक्षांना देऊन ठेवला.
विधानसभेच्या वेळी समन्वयाचा अभाव होताच. त्याहीपेक्षा लोकसभेचे यश सगळ्यांच्या डोक्यात गेेले, असे ताशेरे ओढत उद्धव यांनी महाविकास आघाडीला या मुलाखतीत धारेवर धरले. उद्धव म्हणतात, लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचे आहे, हे आपलेपण होते. विधानसभेला (मात्र) मला जिंकायचे आहे हा आपल्यात जो ‘मी’पणा आला तेव्हा पराभव आला.
महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसह अनेक चांगली कामे केली; पण ती झाकली गेली. लोकसभेला संविधान बदलाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. विधानसभेला राज्यावर फोकस राहिला पाहिजे होता, तो तितका राहिला नाही, असा ठपका ठेवतानाच कुणावरही याचे खापर फोडण्यास उद्धव यांनी नकार दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस तर पडलाच. त्यात बरेच लोक वाहून गेले, हे आजही मान्य केले जाते; पण आपल्याकडून जी काही उणीव राहिली ती आपण मान्य केली पाहिजे. शेतकर्यांची कर्जमुक्ती, शिवभोजन थाळी, पिकांना हमीभाव, व्यवस्थित कायदा व सुव्यवस्था अशी आपण केलेली कामे सांगू शकलो नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारावरच ठपका ठेवला.
उद्धव म्हणतात, मुळात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी होईपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक होते. आम्ही एकत्र आलो तेच सरकार स्थापन करायला. आधी आघाडी, निवडणूक, मग बहुमत मिळाले तर सरकार, असा क्रम असतो. आमचा उलटा प्रवास झाला. आम्ही आधी सरकार स्थापन केले आणि नंतर निवडणुकीला सामोरे गेलो.
केंद्राचा पाठिंबा नसतानाही, अर्थव्यवस्था रुळावर नसताना, आम्ही सरकार आदर्श पद्धतीने चालवले. त्या काळात अर्थव्यवस्था शेतकर्यांनी सांभाळली. हे सगळे आम्ही प्रचारात सांगू शकलो नाही; मग निवडणुकीत घोषणांची चढाओढ लागली. तुम्ही 2,100 देताय, आम्ही 2,500 देतो, 3,000 देतो... त्यात आम्ही चांगली कामे जनतेला सांगू शकलो नाही.