

मुंबई : विरोधी पक्षाचा आमदार, खासदार असेल तर फंड देण्यासाठी मुठी आवळल्या जातात. आता सत्ताधार्यांमध्येच एकमेकांच्या नसा आवळल्या जात आहेत. आजच एक बातमी वाचली, बाबा मला मारलं, म्हणत कोणीतरी दिल्लीत गेला. ही लाचारी कशासाठी, असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीला टोमणा हाणला.
त्यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती, असा चिमटाही उद्धव यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना काढला.2014 मध्ये आम्ही मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी एक दप्तर पत्रकार परिषदेत ठेवले होते. त्यामध्ये एसडी कार्डमध्ये अभ्यासक्रम ठेवला होता. 2014 पासून पुढे तीन-चार वर्षे ते सुरू होते. पण आताचे मला माहीत नाही, याचे कारण गेली तीन ते चार वर्षे महापालिकेचा बाप कोण आहे, तेच समजत नाही. महापालिकेत लुटालूट चालली आहे, असे उद्धव म्हणाले.
सध्या मुलांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे? आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार-खासदार फोडायचे. खुर्चीवर बसलो की बाकीचे जग जाऊ दे. मग लोक नुसत्या रेवड्यांवर भुलून चुकीची माणसे निवडतात. त्यापेक्षा काय निवडायचे हे तुम्ही शिकवले पाहिजे. खड्यांमधून तांदूळ निवडायचे की तांदूळातून खडे निवडायचे हे काम आता शिक्षकांनी केले पाहिजे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
मग प्रवेश का दिला?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत पालघर जिल्ह्यातील साधू हत्याकांडातील आरोपीला पक्षात प्रवेश देण्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलेे. या हत्याकांडात आरोपी काशिनाथ चौधरी सामील असतील तर, भाजपने प्रवेश का दिला? आणि सामील नसेल तर, प्रवेशाला स्थगिती का दिली? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. चौधरी यांचा संबंध नसेल तर त्यांची, हिंदू आणि शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपने माफी मागावी, अशी मागणीही ठाकरेंनी केली. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.