मुंबई : एकीकडे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती आणि आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर म्हणजेच संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुखांवर सोपवला आहे. मात्र, महाराष्ट्रद्रोह्यांना फायदा होईल अशा युती आणि आघाडी करू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवन येथे राज्यातील जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचे झाल्यास स्थानिक पातळीवर युती-आघाडी करण्यासंदर्भात आढावा घ्या. परंतु, असे निर्णय घेताना पक्षाशी गद्दारी करणार्या आणि महाराष्ट्रद्रोह्यांना फायदा होईल असा कोणताही निर्णय घेऊ नका असेही ते म्हणाले. तसेच युती-आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या.
निवडणुकीची तयारी म्हणून घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क वाढवा, त्यांना महाविकास आघाडी सरकारमधील आपली कामे समजावून सांगा, मतदारांमध्ये उत्साह वाढवा, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले, कुठे वाढले, बोगस मतदार शोधा. घराघरात जाऊन मतदार यादीप्रमाणे नावांची चौकशी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
बारामती : महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील सर्वांपेक्षा मुंबईमध्ये अधिक शक्ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. त्यामुळे त्यांना तेथे विचारात घ्यावे लागेल. महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवाव्यात असा विचार आहे, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, पुढील तीन महिन्यांत ती प्रक्रिया सुरू होईल. त्यात आम्ही सर्व सहभागी होऊ. आम्ही अजून चर्चा केलेली नाही. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि आम्ही एकत्र बसून एकत्रीतच निवडणुकीला सामोरे जाता येईल का याचा विचार करू, असेही खा. शरद पवार यांनी सांगितले. सध्या चांगला पाऊस होतो ही अत्यंत उपयुक्त स्थिती आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होते आहे. सरकारने त्यांना तिथे मदत करावी. पण पाऊस पडणे हे नुकसानीचे नाही, असे देखील खा. शरद पवार यांनी सांगितले.