

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (दि. १०) विधान भवनात सादर झाला. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेत राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडला. दरम्यान, या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत टीका केली. (Uddhav Thackeray on Budget)
ते पुढे म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प अत्यंत बोगस आहे . अर्थसंकल्प म्हणजे एक आभास योजना असून सामान्यांसाठी काहीच तरतूद केलेली नाही. राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रूपये दिले नाही, निवडणुकीच्या आगोदर २१०० रूपये वाढवू , मगच मत द्या, असे का सरकार म्हणाले नाही, असा निशाणा ठाकरे यांनी साधला.
महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना नव्हे, तर आभास योजना आहे. अर्थसंकल्पात मेट्रोवर खर्च टाकण्यात आला आहे. पण मुंबईतील बेस्टसाठी खर्च करण्यात आलेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ बंद का झाले ?, याचे उत्तर सरकारने द्यावे.