

मुंबई : उद्धव ठाकरे आता मुस्लिमांचे नेते झाले आहेत, हा भाजपने सातत्याने सुरु ठेवलेला आरोप गुरूवारी (दि.२) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उलटवण्याचा प्रयत्न केला. ते शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईदच्या दिवशी मुस्लिमांकडचे जेवण यायचे, असे सांगत उध्दव ठाकरे थांबले नाहीत तर त्यांनी थेट संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला.
मुस्लिम समाजातल्या सर्वोच्च धर्मगुरुने मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत, असे नमूद केल्याचे वृत्त उध्दव ठाकरे यांनी फडकावले. तसेच भागवत हे मुस्लिमांशी संवाद साधत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपने त्यांच्या झेंडयावरचा हिरवा रंग काढून टाकावा, असेही थेट आव्हान त्यांनी यावेळी केले.
उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेतून हिंदुत्ववादी मतदारांना समवेत घेण्याच्या समीकरणावर जोर दिला, असा निष्कर्ष काढला जात आहे. दरम्यान मुंबईतले १२ ते १५ टक्के मुस्लिम मतदार शिवसेना उबाठाबरोबर जातील, असे मानले जाते. हा आधार घेत ठाकरेंनी हिंदुत्व सोडले, असा आरोप होत आहे. ही हिंदुत्वाची वोटबँक आज उध्दव ठाकरे यांनी पुन्हा स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न केला. आज मला नावे ठेवणारे स्वत: काय करतात, असा प्रश्न करतानाच उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांचे यावेळी बिगुल फुंकले.