Uddhav Thackeray | प्रस्तावाची वाट कशाला बघता? पूरग्रस्तांसाठी पीएम केअर फंडातून 50 हजार कोटी द्या

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांना आवाहन
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray | प्रस्तावाची वाट कशाला बघता? पूरग्रस्तांसाठी पीएम केअर फंडातून 50 हजार कोटी द्याfile photo
Published on
Updated on

मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करून हेक्टरी 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्या, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे शनिवारी केली. पुढील आठवड्यात मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, तेव्हा त्यांनी पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. दरम्यान, महाराष्ट्रावर आलेल्या संकटावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याबाबत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकताच एक दिवसाचा दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन शेतकर्‍यांना कर्जमुक्ती आणि आर्थिक मदत देण्याची मागणी करताना केंद्र व महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. शेतकर्‍यांची भेट घेतली तेव्हा, यापूर्वी तुम्ही जशी कर्जमाफी केली तशी कर्जमाफी आता करा, ते करण्यासाठी सरकारला भाग पाडा, अशी शेतकर्‍यांनी मागणी केल्याचे सांगतानाच ते पुढे म्हणाले, सरकारने दिलेली आणि जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. हा शेतकर्‍यांचा अपमान आहे. शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्ज आहे, पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या मुलांची वह्या-पुस्तके वाहून गेली आहेत, ती घ्यायची कशी? असा प्रश्न त्यांच्यासामोर आहे. दोन लाखांच्या कर्जासाठी 31 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे सरकारने कोणतेही कारण न देता शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्त केले पाहिजे.

पंजाब सरकारने शेतकर्‍यांना कालबद्ध कार्यक्रम करून हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील पंजाबसाठी 1,600 कोटी आणि हिमाचल प्रदेशसाठी 1,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती; पण तशी मदत महाराष्ट्रात झालेली नाही, असे सांगतानाच पंजाबप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेदेखील हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी. तसेच, शेतकर्‍यांच्या कर्जासाठी बँकांकडून येणार्‍या नोटिसी तत्काळ थांबवा. ज्याप्रमाणे थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार थकहमी घेते, त्याचप्रमाणे सरकारनेही शेतकर्‍यांच्या कर्जाची थकहमी घ्यावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

आम्ही पंचांग काढून बसलो नाही

महायुती सरकारने गेल्या दोन-तीन वर्षांतील 14 हजार कोटींची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेली नाही. तसेच, शेतकर्‍यांना 2017 च्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे, असे सांगतानाच महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मी शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले. इतरही वेळेला संकटे आली तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नव्हतो, असा मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरस्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन केलेल्या चर्चेवरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधानांनी मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. मात्र, सर्व काही समोर दिसत असताना कसली चर्चा करता आणि कसला प्रस्ताव मागता, असा संताप व्यक्त करत आज महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का, असा सवालही त्यांनी विचारला.

अंगलट आले की, फाटे फोडायला जमते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना फंडाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीसांच्या अंगलट आले की, त्यांना फाटे फोडायला फक्त जमते. कोरोना काळात भाजपच्या आमदार-खासदारांनी सगळे पैसे पीएम केअर फंडासाठी दिले होते. त्यामुळे, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे सुनावत कोरोना काळातील उणीदुणी काढायची असतील तर चर्चेला माझी तयारी आहे, असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news