नागपूर : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उबाठा गटाने महाविकास आघाडीत नागपूर जिल्ह्यातील 5 जागांवर दावा करीत दडपण वाढविण्यास सुरुवात केली आहे. उद्या (रविवार) 29 सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत. शिवसेना नेते माजी मंत्री भास्कर जाधव विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज (शनिवार) नागपुरातील रविभवन येथे नागपूरसह पूर्व विदर्भातील संघटनात्मक आढावा घेत आहेत.
नागपूर जिल्हात आम्हाला 5 जागा हव्यात, रामटेक, कामठी, उमरेड आणि शहरातील नागपूर दक्षिण आणि नागपूर पूर्व या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण निमित्ताने उद्या उद्धव ठाकरे कळमेश्वरला येणार आहेत.
उद्या पूर्व विदर्भातील जागांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पितृ पक्षात मविआ यादी जाहीर करणार का, असे छेडले असता मी बरीचशी कामे पितृपक्षात करतो. उद्या यादी जाहीर झाली तरी अशुभ मानत नाही असेही जाधव यांनी स्पष्ट करीत शिवसेना मविआत आक्रमकपणे पुढे जात असल्याचे संकेत दिले.