

मुंबई : दंगलीसह बॉम्बस्फोटाच्या ट्विटनंतर मुंबई शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, शहरातील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. संशयितांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. डोंगरी परिसरात काही बांगला देशी आणि पाकिस्तानी नागरिकांकडून दंगलीसह बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्यानंतर सर्वच पोलिसांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री अकरा वाजता एका अज्ञाताने नवी मुंबई पोलिसांना ट्विट करून मुंबई पोलिसांनी सतर्क राहावे. 31 मार्चला गुढीपाडवा आणि 31 मार्चला रमजान ईद असल्याने काही रोहिंग्या, बांगला देशी, पाकिस्तानी नागरिकांकडून डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ करुन दंगली घडविण्यात येणार आहे. त्याचा फायदा घेऊन काहीजण बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याची गंभीर दखल घेत सर्वच पोलिस ठाण्यांना 29 ते 31 मार्चदरम्यान सतर्क राहण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत.
मुंबईकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयिताची माहिती त्वरित पोलिसांना द्या, कायदा व सुव्यवस्था बिघडले असे कोणतेही कृत्य नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.