MPSC Students Protest : एमपीएससी आंदोलनाच्या चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार; गट-क पदांची संख्या वाढवण्याचे आश्वासन
IAS Tukaram Mundhe
IAS Tukaram Mundhe File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार रोहित पवार आणि आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. एमपीएससीशी संबंधित चौकशी समितीच्या सचिवपदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

एस. एम. जोशी पुलावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. सरकारच्या भूमिकेसंदर्भातील मसुदाही त्यांनी रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. रोहित पवार यांनी हा मसुदा विद्यार्थ्यांना वाचून दाखवला. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीममवार यांच्या राजीनाम्याबाबत मसुद्यात कोणताही उल्लेख नसल्याने रोहित पवार यांनी अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची मागणी पुन्हा केली. त्यामुळे सरकारच्या आश्वासनानंतरही विद्यार्थ्यांची ही प्रमुख मागणी कायम असल्याचे स्पष्ट झाले.

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार

आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घेण्यात येतील, असे आश्वासन शिवेंद्रराजे यांनी दिले. एमपीएससी प्रकरणात चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, आगामी काळात होणाऱ्या गट-क पदांच्या परीक्षेसाठी पदांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. दरम्यान, अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने आंदोलन मागे घेण्याबाबत विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news