

मुंबई : येत्या 20 डिसेंबरला त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली. दरम्यान त्यांनी सोमवारी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान हिंदी असायला हरकत नाही, पण राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती लादू नका, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.
राज्यातील भाषिक धोरणाविषयी जनमत समजून घेण्यासाठी त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव हे राज्यातील विविध नेत्यांशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रा. जाधव यांनी भेटीची माहिती दिली.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्रिभाषा धोरण आणि शालेय शिक्षणाच्या इतर अनेक बाबींवर आमची विस्तृत चर्चा झाली. हा चांगला संवाद होता, असे सांगतानाच पहिलीपासून हिंदीची सक्ती असता कामा नये, हा मुद्दा त्यांनी ठासून मांडल्याचे जाधव यांनी सांगितले. तसेच हिंदीची सक्ती करण्यासाठी ही समिती स्थापन झाल्याचा त्यांचा समज होता, परंतु तसे काही नसल्याची ग्वाही आपण उद्धव ठाकरेंना दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
भाषा समितीच्या अंतिम अहवालाची तयारी सुरू असून, विविध राज्यांतून मिळालेल्या प्रतिक्रिया त्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. मंगळवारी नाशिक आणि 13 नोव्हेंबरला पुणे येथे जनमत जाणून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. लोकांचे प्रश्न, समस्या आणि भाषासंदर्भात मते जाणून घेण्यात येतील. त्यानंतरच भाषेबाबत भूमिका जाहीर केली जाईल, असे जाधव म्हणाले.