मिथेनॉलपासून विषारी दारू

पुरवठादार, बेकायदा मद्य उत्पादकांमध्ये साखळी
toxic-liquor
मिथेनॉलपासून विषारी दारूPudhari News Network

मुंबई : तामिळनाडूतील विषारी दारूकांडाचे पडसाद थेट संसदेपर्यंत उमटले आहेत. विषारी मद्य ढोसल्याने 50 हून अधिक मद्यपींचा मृत्यू झाला असून, 80 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडूसारखेच देशातील कोणत्या ना कोणत्या राज्यात दरवर्षी विषारी दारूकांडाच्या घटना घडत असतात. मिथेनॉलमिश्रित दारू पिल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर दारूकांडाला कारणीभूत ठरणार्‍या मिथेनॉलसह अन्य घटनांवर टाकलेला प्रकाशझोत...

इथेनॉलपासून बनविले जाणारे मद्य हे कायदेशीर असते. जैविक घटकांमुळे हे मद्य जीवघेणे ठरत नाही. याउलट? मिथेनॉल हे कोळशापासून तयार होणार्‍या जीवाश्मापासून तयार केले जाते. मिथेनॉल अतिविषारी असते. साखर कारखान्यातील डिस्टिलरी प्रकल्पामध्ये मळीपासून मद्यार्काची निर्मिती केली जाते.

स्पिरिटच्या शुद्धीकरणापासून मद्य तयार केले जाते. या मद्याच्या विक्रीपासून राज्य सरकारला मोठा महसूल प्राप्त होतो. डिस्टिलरीमध्ये इथेनॉल तयार करताना मिथेनॉलचेही उत्पादन घेतले जाते. ही प्रक्रिया अतिशय नियंत्रित असते. इथेनॉलनिर्मितीनंतर हळुवारपणे मिथेनॉल बाजूला काढले जाते. तामिळनाडूसह देशातील बहुतांश राज्यांत मिथेनॉल निर्मिती, वाहतूक आणि साठवणुकीवर कडक नियंत्रण असते. मिथेनॉलची गुणवत्ता आणि प्रमाण वेळोवेळी तपासली जाते. तामिळनाडूसह अनेक राज्यांत बेकायदा मद्यनिर्मितीसाठी मिथेनॉलचा पुरवठा केला जातो. तामिळनाडूतील डिस्टिलरीमध्ये उपपदार्थाची निर्मिती करताना तयार झालेले मिथेनॉल बाजूला काढले नसल्यामुळे विषारी दारूकांड घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारतातील विषारी दारूकांडाच्या अनेक घटना मद्यात मिथेनॉलचे मिश्रण झाल्यामुळे झाल्या आहेत. मिथेनॉलचे उत्पादन आणि विक्री याचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे. बेकायदा मद्यनिर्मिती करणार्‍यांना या मिथेनॉलची विक्री केली जात आहे. बेकायदा मद्याची निर्मिती करताना मद्यात मिथेनॉलची मात्रा मोठ्या प्रमाणात मिसळली जात असल्याचे सांगण्यात येते. स्वस्तात मिळत असल्याने मद्यपी नशा आणि किक बसण्यासाठी मिथेनॉलमिश्रित मद्याचे सेवन करतात.

मुंबईतील मालवणी विषारी दारूकांडामध्ये 2015 साली 100 जणांचा मृत्यू झाला होता, तर 75 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 14 आरोपींवर मिथेनॉलमिश्रित दारूचा पुरवठा केल्याचा आरोप होता. आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुराव्याअभावी काहींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इको-फ्रेंडली जैविक इंधन बनविण्यासाठी इथेनॉल आणि मिथेनॉलच्या संमिश्रणाची गरज भासणार आहे. याच्या आडून मिथेनॉलचा बेकायदा मद्यनिर्मितीसाठी वापर होत असल्यास केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे कारवाई करायला हवी. कायद्याचा धाक दाखविण्याऐवजी त्याचा त्वरित अंमल करायला हवा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news