

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याने खार पश्चिम येथील आपला आलिशान फ्लॅट ९ कोटी रुपयांना विकला आहे. जुहू येथे त्याच्या वाहनाजवळ गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर अवघ्या चार दिवसांनी, म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी या मालमत्ता विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी झाली.
नवव्या मजल्यावरील आलिशान फ्लॅट
टायगर श्रॉफचा हा फ्लॅट खार पश्चिमेतील रुस्तमजी पॅरामाउंट डी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नवव्या मजल्यावर आहे. फ्लॅटचे चटई क्षेत्रफळ १,२९१.१४ चौरस फूट असून, त्यासोबत ९५.८० चौरस फुटांचे अतिरिक्त विशेष क्षेत्र आणि दोन वाहनतळांचाही समावेश आहे. या व्यवहारासाठी ५४ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे नोंदणी कागदपत्रांत नमूद आहे.
आठ वर्षांत किमतीत १.३९ कोटींची वाढ
टायगरने १७ जुलै २०१८ रोजी हा फ्लॅट विकासकाकडून ७.६१ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याला या मालमत्तेचा ताबा मिळाला. आता हा फ्लॅट ९ कोटी रुपयांना विकल्याने खरेदी किमतीच्या तुलनेत सुमारे १.३९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
फ्लॅट विक्रीतून टायगर श्रॉफला किती नफा झाला, हे इतर खर्च वजा केल्यानंतरच स्पष्ट होईल. जुहू गोळीबाराच्या घटनेनंतर काही दिवसांतच हा व्यवहार झाल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.