

मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात शक्ती नावाच्या वाघाचा संशयास्पद मृत्यू होण्यापूर्वी त्याचा बछडा रुद्र या वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुद्र हा शक्ती आणि करिश्मा यांचा 3 वर्षाचा बछडा होता.
29 ऑक्टोबर 2025 रोजी त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर रुद्र वाघाच्या मृत्यूची बातमी समाजमाध्यमातून समोर आल्याने राणीबाग प्रशासनाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे राणीबाग प्रशासनाचे अधिकारी वाघांच्या मृत्यूबाबत लपवाछपवी का करत आहेत? मृत्यूची माहिती दीड महिना दडवून का ठेवली? या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता प्राणीप्रेमींकडून करण्यात आली.
17 नोव्हेंबर 2025 रोजी राणीबागेतील शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर राणीबाग प्रशासनाने तब्बल 15 दिवसानंतर त्याच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण दिले होते. त्यावेळीसुध्दा प्रशासनाने हयगय केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप व्याघ्रप्रेमींनी केला होता. रुद्र हा केवळ 3 वर्षाचा होता. त्याला जन्मापासून रक्त परजीवी आजार असून त्याच्यावर लहान पणापासून उपचार सुरू असल्याचे राणीबागेतील प्रशासनाने सांगितले. परंतु, रुद्र वाघाच्या आजाराबाबतची माहिती का लपवण्यात आली, असा संतप्त सवाल आता व्याघ्रप्रेमी करत आहेत.
यादरम्यान, शक्ती तसेच रुद्र वाघाच्या मृत्यूनंतर व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून शक्ती वाघाच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. त्याचा मृत्यू संशयास्पदरित्या झालेला आहे. प्राणीसंग्रहालय प्रशासन व त्याच्यावर उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा झाल्याने हा मृत्यू झाला आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना उघड न करणे, त्याची माहिती न देणे, यामागचे नेमके कारण काय, हे सर्व लपवून का ठेवण्यात आले, त्यामागे कुणाचे षडयंत्र होते? असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला.
वाघांच्या मृत्यूची माहिती गुलदस्त्यात का ?
नॅशनल पार्कमधील व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचा मृत्यू झाला तर वनविभाग त्याची माहिती दुसऱ्या दिवशी जाहीर करते. मात्र राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या बछड्याचा दीड महिना आणि शक्ती वाघाचा पंधरा दिवस उलटल्यानंतर प्रशासनाला माहिती जाहीर करण्यास उशीर का होतो? रुद्र वाघ आजारी असताना त्याची वाच्यता कुठेही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही वाघांच्या मृत्यूमागे प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे का तसेच शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली का? असे अनेक सवालही प्रथमेश जगताप यांनी उपस्थित केले.