Paper Leak Case | परीक्षेवर देखरेखीसाठी त्रिस्तरीय कमांड कंट्रोल सेंटरची शिफारस

Paper Leak Case |
Paper Leak Case | परीक्षेवर देखरेखीसाठी त्रिस्तरीय कमांड कंट्रोल सेंटरची शिफारस Pudhari File photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : स्‍पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत सुधारणा सुचविण्यासाठी नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सातसदस्यीय समितीने परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी तीनस्तरीय कमांड कंट्रोल सेंटर यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये पहिले नियंत्रण केंद्र एमपीएससीच्या मुख्यालयात, दुसरे जिल्हास्तरावर आणि तिसरे परीक्षा होणाऱ्या केंद्रावर परीक्षेच्या दिवशी कार्यरत असेल.

पोलिस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीने परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या शिफारशी केल्‍या आहेत. अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महाआयडी किंवा आधारच्या माध्यमातून एकदाच नोंदणी (वन टाईम रजिस्ट्रेशन) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज करताना वारंवार प्रमाणपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नाही.

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४ अंतर्गत संघटित परीक्षा गैरप्रकारांसाठी सध्या पाच ते दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. मात्र, समितीने ही शिक्षा सात ते दहा वर्षांपर्यंत कायम ठेवून किमान १० कोटी रुपयांचा दंड करण्याची शिफारस केली आहे. तसेच गैरप्रकारांमुळे झालेल्या नुकसानीची वसुली आणि दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये गैरमार्गांचा वापर करणाऱ्या उमेदवारांसाठीही कठोर शिक्षेचा प्रस्ताव आहे. सध्या अशा उमेदवारांना तीन ते पाच वर्षांचा कारावास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. समितीने ही शिक्षा वाढवून पाच ते दहा वर्षांचा कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची शिफारस केली आहे. परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थांसाठीचा दंड एक कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच परीक्षा आयोजनाचा खर्च संबंधित संस्थांकडून वसूल करून त्या संस्थेवर आठ वर्षांची बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

अन्य महत्त्वाच्या शिफारशी

एमपीएससीने दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षांच्या तारखांबाबत आधीच स्पष्टता मिळेल.

अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महाआयडी किंवा आधारच्या माध्यमातून एकदाच नोंदणीची सुविधा द्यावी. तसेच परीक्षा शुल्काचा परतावा उमेदवारांच्या आधारशी संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्याची व्यवस्था करावी.

संघटित परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या संस्था आणि सेवा पुरवठादारांची मालमत्ता जप्त करताना कायदेशीर संदिग्धता दूर करण्यासाठी मालमत्तेच्या व्याख्येत जमीन, इमारती, जंगम मालमत्ता, बौद्धिक संपदा तसेच डिजिटल आणि आभासी मालमत्तांचा समावेश करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.