

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दुर्गराज रायगडावर एका काल्पनिक दंतकथेतून तयार झालेले वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथून हटवावे, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. याच विषयासंदर्भात बुधवारी पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली आणि त्यांना माहिती दिली, यासंदर्भात मुख्यमंत्र्याची पुन्हा भेट घेणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. तसेच तसेच वाघ्या कुत्र्याचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा मोठी आहे, हे कोणत्याही शिवभक्तांना पटण्यासारखे नाही. वाघ्या कुत्र्याचे स्मारक संवैधनिक पद्धतीने आणि सगळ्यांना विचारात घेवून ते काढले जाईल, आम्ही कुठेही कायदा हाती घेणार नाही. यासाठी कुणाशीही चर्चा करण्याची तयारी आहे, हवे तर सरकारने इतिहासकार, सरकारचे प्रतिनिधी आणि संबंधित सर्वांची एक समिती स्थापन करून खुली चर्चा करावी, असे वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. (Waghya Statue Raigad)
राजधानी दिल्लीत संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वाघ्या कुत्रा प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कुठलाही ऐतिहासिक संदर्भ किंवा नोंद वाघ्या कुत्र्याला नाही. एकाही इतिहासकाराने सांगितले नाही की वाघ्या कुत्र्याचे पुरावे आहेत. हवे तर सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवून पुरावे मागावेत. अनेक शिवभक्तांनी पुरातत्त्व विभागाकडे वाघ्या कुत्र्या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली. पुरातत्त्व विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, संरक्षित स्मारकामध्ये वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. वाघ्या कुत्र्याचे स्मारक १९३६ ला तयार झाले. २०३६ पर्यंत ते काढले नाही तर त्याची नोंद संरक्षित स्मारक म्हणून नोंद होईल, असेही पुरातत्व विभागाने सांगितले. दरम्यान, यापूर्वीही अनेक शिवभक्तांनी या विषयाला हात घातला. मात्र, न्याय मिळाला नाही म्हणून मला यावर बोलावे लागत आहे. महाराष्ट्र सरकारने १९७४ साली पुरातत्व आणि अभिलेखागार विभागाचे महाराष्ट्राचे तत्कालीन संचालक खोबरेकर यांना छापायला लावलेल्या पुस्तकातही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही, असेही ते म्हणाले.
शिवाजी महाराजांना ज्यावेळी अग्नी देण्यात आली तिथे वाघ्या कुत्र्याने उडी मारली, असा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. बाबासाहेब पुरंदरे यांनीही राज ठाकरे यांना सांगितले की वाघ्या कुत्र्याने अग्नीत उडी मारल्याचा कुठलाही पुरावा नाही. यावेळी संभाजीराजेंनी १९२५ पूर्वी रायगडावरील समाधीचे जीर्णोद्धार होण्यापूर्वीचे चित्र दाखवले. आणखी एक चित्र त्यांनी दाखवले. १९२६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या मागणीतून एक स्मारक समिती तयार झाली होती, या समितीने १९२६ मध्येच जिर्णोद्धार पूर्ण झाला होता. त्यानंतर १० वर्षांनी १९३६ ला वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभे राहिले. राजसन्यास नाटकातून वाघ्या कुत्रा ही दंतकथा आणि पात्र आले. या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी बलिदान दिले, त्यांचे स्मारक कुठे नाहीत आणि वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभे राहते, हे अनाकलनीय आहे. इंदोरच्या तुकोजी होळकरांनी या स्मारकासाठी मदत केल्याचे सांगितले जाते. होळकर घराण्यातील अनेक लोकांनी हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्य दिले. तुकोजी होळकरांबद्दल असा उल्लेख करून त्यांची बदनामी केली जात आहे. तुकोजी होळकर हे शिवभक्त होते. शेिवाजी महाराजांच्या समाधीसमोर कुत्र्याचे स्मारक बनवण्यासाठी तुकोजी होळकर कसे काय मदत करतील? त्यांचा चुकीचा इतिहास पुढे आणला जातोय हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले. होळकर आणि छत्रपती घराण्याचे खुप जुने संबंध आहेत. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराज आणि होळकर घराण्याचे आताचे वंशज भूषण होळकर यांचे आजोबा शिवनारायण होळकर यांचे लग्न जुन्या राजवाड्यात स्वतः शहाजी महाराजांनी घडवून आणले, असेही संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक हा विषय जातीच्या अनुषंगाने दुसरीकडे नेत आहेत. धनगर समाज हा विश्वासू समाज आहे. मला आयुष्यभर ज्याने सांभाळले ते आमच्या घरचे स्वयंपाकी, माझे अंगरक्षक, वाहनचालक हे धनगर समाजाचे आहेत. वाघ्या कुत्र्याचे किल्ल्याच्या खाली काही तरी करता येईल, असेही ते म्हणाले. तसेच मी ३१ मे चा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला नाही. गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण ३१ मे पर्यंत काढणार असा राज्य सरकारचा शासन आदेश आहे. त्याचाच आधार घेत मी माझे मत मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य पेक्षा काही मोठे आहे का, असा प्रश्न विचारत सर्वांना विश्वासात घेऊन वाघ्या कुत्र्याचे स्मारक काढले जावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी पेक्षा मोठे काही असणे हे कोणालाही पटणार नाही. नेमकी तीच जागा वाघ्या कुत्र्याचा स्मारकाला का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.