

मुंबई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची क्रूर कहाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी सभागृहात मांडली तेंव्हा विधानसभा अक्षरशः सुन्न झाली. यावेळी परळी आणि बीड जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गुंडगिरी फोफावली असून या संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्याची मागणी यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी केली.
यावेळी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे क्रूर हत्याकांड घडविणार्या टोळीचा खरा आका शोधून कडून त्याला अटक करण्याची मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी तर या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून करून काही फायदा होणार नाही. सरकारमध्ये बसलेल्याची चौकशी करण्याची हिम्मत कोणीही दाखविणार नाही. संशय असलेल्या मंत्र्यांचा आधी राजीनामा घ्या आणि मग न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी केली. या चर्चेला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत. नियम 101 अन्वये संतोष देशमुख आणि परभणी येथे झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या नाना पटोले, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.