

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui Murder Case Update) यांच्या हत्या प्रकरणात आता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्या भावाचे नाव समोर आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी शूटर्स लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याच्या संपर्कात होते. तीन संशयित शूटर्स हत्येच्या घटनेपूर्वी अनमोल बिश्नोईशी इन्स्टंट मेसेजिंग ॲप स्नॅपचॅटच्या (Snapchat) माध्यमातून बोलत होते. अनमोल बिश्नोई हा कॅनडा आणि अमेरिकेत असणाऱ्या संशयित आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे.
संशयितांकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी आतापर्यंत १० संशयितांना अटक केली आहे. यात दोन शूटर्स आणि एका शस्त्रास्त्र पुरवठादाराचा समावेश आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी शूटर शिवकुमार गौतम आणि इतर संशयित फरार आहेत. हे संशयित स्नॅपचॅटद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच सूचनेचा मेसेज मिळाल्यानंतर ते संभाषण लगेच डिलीट करायचे. तसेच अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे स्नॅपचॅट तपासण्यात आले आहे. त्यातून शूटर आणि प्रवीण लोणकर हे थेट अनमोल बिश्नोई याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे मुंबई गुन्हे शाखेने म्हटले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेला घटनास्थळावरुन चार मोबाईल फोन मिळाले होते. ते फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाला आहे. स्नॅपचॅटच्या विश्लेषणातून बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई याचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या ४ संशयित आरोपींच्या पोलिस कोठडीत २५ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे सर्वजण तपासात सहकार्य करीत नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरिशकुमार निषाद अशी संशयित आरोपींची नावे आहेत.