

मुंबई : उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाची शनिवारपासून १४.९५ टक्के भाडेवाढ झाली आहे; परंतु ही भाडेवाढ सम प्रमाणात झालेली नसून विषम प्रमाणात झाली आहे. त्यामुळे तिकीट दरात एक, दोन रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांना सुट्टे एक आणि दोन रुपये घेऊन प्रवास करावा लागत आहे. या सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होत आहेत.
नव्या तिकीट दराप्रमाणे फुल तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ रुपयांचे झाले आहे, तर हाफ तिकीट ६, ११, १६, २१, २६, ३१, ३६, ४१, ४६, ५१ आणि ५६ रुपये झाले आहे. पूर्वी तिकीट पाच रुपयांच्या पटीत होते, ते आता एक रुपयांच्या पटीत केले आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना अतिरिक्त एक रुपया खिशात ठेवावा लागत आहे.
एसटीने दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासादरम्यान प्रवाशांना १०,२०,५० रुपयांसह एक रुपया सुट्टा वाहकांना द्यावा लागत आहे. परंतु प्रत्येक प्रवाशाकडे एक रुपया सुट्टा असतोच असे नाही. अशावेळी प्रवाशांना एका रुपयासाठी उर्वरित पैसे सुट्टे देण्याची वेळ वाहकांवर आली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये वारंवार वाद सुट्ट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये वारंवार वाद होण्याची भीती आहे.
एसटीने दिवसभरात ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात २० लाख महिलांचा समावेश आहे. एसटीचे सर्वाधिक प्रवासी हे ग्रामीण भागातून प्रवास करतात. यातील बहुतेक प्रवाशांकडे स्मार्ट फोन नसतो. त्यामुळे या प्रवाशांचा ऑनलाईन तिकीट काढण्याकडे कल नसतो.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात सम प्रमाणाच्या पटीत भाडेवाढ झाली होती. रावते हे सामाजिक कार्यकर्ते असल्याने चालक-वाहक व सर्व कर्मचारी यांच्याशी बोलून स्वतः दररोज लक्ष ठेऊन काम करायचे. मात्र नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः विकासक असल्याने यांना फक्त जागा कशा विकसित करायच्या एवढेच ठाऊक आहे. त्यामुळे जे रावते यांना कळले, ते प्रताप सरनाईक यांना कळले नाही. त्यांनी एसटीला आधी समजून घेण्याची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.