

मुंबई ः मुंबईत बांगला देशी आणि रोहिंग्या घुसखोरांची संख्या प्रचंड गतीने वाढत असून, त्याचे गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे. या घुसखोरांची संख्या वाढत असल्याने मुंबईत 2051 पर्यंत हिंदूंची संख्या 54 टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा इशारा टाटा सामाजिक विज्ञान संस्था अर्थात ‘टीस’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिला आहे.
‘टीस’च्या या अहवालामुळे मुंबईतील वाढत्या घुसखोरीचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजण्याची चिन्हे आहेत. ‘टीस’चे प्र-कुलगुरू शंकर दास आणि सहायक प्राध्यापक सौविक मंडल यांच्या टीमने हा अभ्यास केला आहे. अभ्यासासाठी 3,000 स्थलांतरितांशी चर्चा झाली; परंतु अंतरिम अहवालात केवळ 300 जणांशी केलेल्या चर्चेचा आधार घेण्यात आला आहे. या अभ्यासातील सविस्तर अहवाल येण्यासाठी 5 ते 6 महिने लागणार आहेत. ‘टीस’चे सहायक प्राध्यापक सौविक मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक गंभीर अभ्यास आहे. बांगला देशी रोहिंग्या मुंबईत बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून स्थायिक झाले आहेत. ते हवाई मार्गाने नव्हे तर सीमा ओलांडून आले आहेत.
टीसच्या अहवालानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमारच्या घुसखोरांची संख्या वाढते आहे. म्यानमारचे मुस्लिम रोहिंगे म्हणून ओळखले जातात. मुंबईत घुसखोरांच्या वाढत्या संख्येत तशीही मुस्लिमांची संख्या अधिक आहे. या अहवालानुसार, 1961 साली मुंबईच्या लोकसंख्येत हिंदू 88 टक्के होते. त्यात दरवर्षी घट होत 2011 मध्ये हा टक्का 66 वर आला. या तुलनेत 1961 साली मुंबईत मुस्लिमांची लोकसंख्या 8 टक्के होती. ती 2011 मध्ये 21 टक्क्यांवर पोहोचली. मुस्लिमांच्या म्हणजेच घुसखोरांच्या लोकसंख्येचा हा चढता आलेख असाच राहिला तर 2051 पर्यंत मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 54 टक्क्यांवर येईल आणि मुस्लिमांची लोकसंख्या मात्र 30 टक्क्यांवर जाईल, असा अंदाजही या अहवालाने व्यक्त केला आहे.
टीसचा अहवाल म्हणतो की, खासकरून मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये अवैध घुसखोरांचे लोंढे रोज आदळत आहेत. या लोंढ्यांचा ताण मुंबईच्या पायाभूत सुविधांवर वाढत चालला आहे. मुंबईचे शिक्षण, स्वच्छता, वीज, पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवा आधीच जेमतेम असल्याने त्यात घुसखोर वाटेकरी वाढले आणि यातून उदाहरणच द्यायचे तर मानखुर्द, कुर्ला आणि गोवंडीसारख्या भागांत वीज आणि पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांगला देश आणि म्यानमारमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून, काही प्रमाणात नेपाळ आणि पाकिस्तानातूनही स्थलांतर होत आहे. सर्व ठिकाणांहून येणारे स्थलांतरित मुंबईतल्या ठराविक ठिकाणी एकत्रित होत आहेत. धारावी, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, उत्तर मुंबईतील आंबेडकरनगर तसेच कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, पूर्व मुंबईतील सरदंग, माहिम पश्चिम, गीतानगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित दिसून येतात.