

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई शहर तसेच उपनगरांत काल (बुधवार) सकाळपासून अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्यान, आजही मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर या भागांत आज विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागात जोरदार सरींची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
आज सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता.
त्यानंतर सायंकाळी हवामान विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काल शहर तसेच उपनगरांत दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान,आजही राज्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
त्यात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वातावरण अंशतः ढगाळ विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरी पडू शकतात. दहिसर येथे काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून सकाळपासून दहिसर परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ४० मिमी पावसाची नोंद झाली.
या भागात काही ठिकाणी पाणी साचले होते. तसेच राम मंदिर येथे २.५ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत झालेली पावसाची नोंद पुढीलप्रमाणे...
मरीन लाईन्स - १४ मिमी
नरिमन पॉइंट - १२ मिमी
मुलुंड-२४ मिमी
पवई- १८ मिमी
वांद्रे-कुर्ला संकुल- २२ मिमी
आरे वसाहत - २० मिमी
वर्सोवा उदंचन केंद्र- १९ मिमी