

मुंबई : बहुप्रतीक्षित अशी संपूर्ण भुयारी मेट्रो ३ मार्गिका अखेर मुंबईकरांना प्रवासासाठी खुली झाली आहे. आज, सोमवारी मेट्रो ३ची पहिली गाडी आरे येथून सकाळी ११ वाजता सुटणार आहे. उद्या, मंगळवारपासून मात्र सकाळी ६.३० वाजल्यापासून ही मेट्रो सेवा सुरू होईल.
आरे ते बीकेसी हा प्रवास रस्तेमार्गे बेस्ट बसने केल्यास साधारण १ ते दीड तास लागतो. शिवाय वाहतूक कोंडीतही अडकावे लागते. मुंबईबाहेरून येणारी वाहने आणि स्थानिक वाहने यांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करणेही दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. मेट्रा ३ ही एकूण मार्गिका ३३.५ किमीची असली तरी आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा १२.६९ किमी अंतराचा आहे. या टप्प्यात दहा स्थानके आहेत. ताशी ९५ किमी इतका या मेट्रोचा वेग आहे. त्यामुळे आरे ते बीकेसी हा प्रवास आता केवळ २२ मिनिटांत करता येणार आहे.
रोज सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत मेट्रो-३ची सेवा सुरू राहील. सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता मेट्रो सेवा सुरू होईल. रोज ९६ फेऱ्या चालवल्या जातील. दर ६ मिनिटे ४० सेकंदांनी मेट्रो सोडली जाईल. किमान १० रुपये ते कमाल ५० रुपये तिकीट दर असेल. आरे ते कफ परेड संपूर्ण मार्गिका सुरू झाल्यानंतर मात्र तिकीटदर आणि फेऱ्यांच्या संख्येत बदल होईल. संपूर्ण मार्गिकेसाठी कमाल तिकीट दर ७० रुपये असेल. ३० ऑक्टोबरपर्यंत एकात्मिक तिकीट प्रणाली उपलब्ध होईल. यामुळे सर्व मेट्रो मार्गिकांवर एकाच तिकिटाद्वारे प्रवास करता येईल. पहिल्या टप्प्यातील मेट्रो ३ मार्गिका मेट्रो १ मार्गिकला मरोळ नाका येथे जोडेल. मरोळ नाका स्थानक भुयारी असून तेथून बाहेर पडून मेट्रो १ मार्गिका गाठता येईल. मेट्रो ७ अ मार्गिकचे विमानतळ स्थानक आणि मेट्रो ३ चे विमानतळ स्थानकही एकाच ठिकाणी आहे. तसेच आरे स्थानकाच्या समोरच मेट्रो ६ मार्गिकचे सीप्झ गाव हे स्थानक आहे.