

मुंबई : गिरगावातील ठाकूरद्वार जंक्शनवर सोमवारी रस्ता खचून बेस्ट बस अडकल्याची दुर्घटना घडली होती. मेट्रोच्या या कारभाराचा त्रास आता पुढील काही दिवस प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. येथील दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून ठाकूरद्वार ते चर्नी रोड स्थानक रस्ता काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
येथील दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत होण्यास चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार असल्याचे महापालिकेच्या डी विभाग अधिकार्यांनी सांगितले.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी सकाळपासून गिरगावातल्या ठाकूरदार जंक्शनवरती पालिका, मेट्रो, बेस्ट प्रशासनाचे अधिकारी एकत्र आले होते. त्यांनी रस्ता खोदून सर्व वाहिन्या वेगळ्या करण्याचे काम हाती घेतले आहे. हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे चर्नी रोडबाहेरून भुलेश्वर, झवेरी बाजार, गिरगाव, पायधुनी मार्केटला जाणार्या पादचार्यांना व वाहनचालकांना मोठा फटका बसणार आहे.
मेट्रो 3 प्रकल्प बाधितांसाठी ठाकूरद्वार नाक्यावर 42 मजल्यांच्या दोन इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम माँटो कार्लो कंपनी करत आहे. सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी रस्त्याच्या खाली सोडल्यामुळे रस्त्याखालची माती, विटा, खडी हे साहित्य विस्कळीत होऊन रस्त्याला भगदाड पडले. यात सोमवारी बेस्ट बस अडकल्याची घटना घडली असल्याचा अंदाज पालिका अधिकार्यांनी वर्तवला आहे.