

मुंबई : महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन काम करण्याबाबत दोन्ही ठाकरे बंधूंच्या विधानाचे रविवारी सलग दुसर्या दिवशी पडसाद उमटले. एकत्र येण्याच्या हाकेला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद सशर्त होता, असा आक्षेप घेतानाच ठाकरे गटाने इतरांना महाराष्ट्रद्रोही वगैरेची प्रमाणपत्रे वाटू नयेत, अशी टोलेबाजी मनसे नेत्यांकडून सुरू आहे. त्यावर, कोणतीही अट घातलेली नाही; मात्र काहींना भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात म्हणून असे काटे मारत असतात, असा पलटवार संजय राऊतांनी केला आहे. अट आहे की कट आहे ते दोघांनी ठरवावे, असे म्हणत भाजपने ठाकरे गट आणि मनसेतील टोलवाटोलवीत उडी घेतली आहे.
उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी कोणतीही अट ठेवलेली नाही. फक्त महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे हात मिळवणी करू नये. यापुढील प्रत्येक पाऊल मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकले पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ती पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे, असे ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
भाजपने हिंदुत्वाची किंवा ठाकरे गटाने महाराष्ट्रप्रेमी किंवा द्रोही असली प्रमाणपत्रे देऊ नयेत. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात 17 हजार मनसे कार्यकर्त्यांवर मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल झाल्याबद्दल उद्धव ठाकरे मनसेची माफी मागणार का, असा प्रश्न मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे.
एकाने साद घातली आहे, एकाने अट घातली आहे; पण ती अट आहे की कट आहे, त्या दोघांनी ठरवावे, असे म्हणत मुंबई भाजपाध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले. तो दोघांचा प्रश्न आहे, दोघांनी ठरवावे. नाही तरी ते पारिवारिक पक्ष आहे. त्यांनी आपापसात ठरवले, तर त्यांना शुभेच्छा आहेत, असेही शेलार म्हणाले.
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यास त्याचा निश्चितच परिणाम होईल. शिवसेनेची शक्ती वाढेल. दोन कार्यकर्ते आम्हाला मिळाले, तर शक्ती वाढल्यासारखे वाटते. हे तर नेते आहेत. एखादा पडलेला आमदारसुद्धा आम्ही आमच्यात घेतला, तर शक्ती वाढेल, असे म्हणतो. हे तर नेते आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.