

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) - 2019 मधील गैरप्रकारांमुळे राज्यातील शिक्षक नियुक्त्या संशयाखाली आल्या आहेत. पुणे शहर सायबर पोलीस तपासात काही उमेदवारांची नावे समोर आली आहेत. सीटीईटी किंवा बी.एड.च्या आधारे टीएआयटी-2022 उत्तीर्ण झालेले आणि शिक्षण सेवक पदासाठी न्यायालयीन याचिका दाखल करणार्या या उमेदवारांना नियुक्तीसाठी चारित्र्य पडताळणी अहवाल अनिवार्य करण्यात यावा असे आदेश शिक्षण विभागाने आयुक्तांना दिले आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) - 2019 प्रक्रियेत झालेल्या गंभीर गैरप्रकारांबाबत पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन येथे 56/2021 व 58/2021 या प्रकरणांच्या तपासात काही उमेदवारांची नावे समोर आली होती. याबाबत आता शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा सर्व उमेदवारांविषयी स्वतंत्रपणे सायबर पोलीस स्टेशन, पुणे यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागविण्यात यावा. उमेदवारावर गुन्हा नोंदवलेला असल्यास किंवा त्याला सहआरोपी करण्यात आले असल्यास त्यास नियुक्ती देऊ नये. मात्र, उमेदवाराविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही किंवा सहआरोपी करण्यात आले नाही, असा अहवाल प्राप्त झाल्यास त्यास शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देता येईल. यासाठी संबंधित उमेदवारांनी शासनाने दिलेल्या नमुन्यातील नोंदणीकृत शपथपत्र सादर करणे बंधनकारक असेल. नियुक्ती प्राधिकार्यांनी वेळोवेळी सायबर पोलीस स्टेशनकडून आवश्यक पाठपुरावा करून अहवाल मिळवावा, असेही निर्देशही शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.
काही प्रकरणे सध्या न्यायालयीन कार्यवाहीत असून अंतिम निर्णय न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून राहील. ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या सध्या तपासाअंतर्गत आहेत, त्यांना पुढील कारवाईपर्यंत तात्पुरती मान्यता राहील. मात्र, न्यायालयीन निकाल आल्यानंतर त्यांच्या सेवासुरक्षेचा अंतिम निर्णय घेतला जाईल असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.