

ठाणे : शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी टीईटी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra TET) 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी या परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपवण्यात आली आहे.
टीईटी परीक्षेमध्ये (TET Exam) गैरप्रकार झाल्याचे प्रकरण गेल्यावर्षी उघडकीस आले होते. त्या पार्श्वभूमीवर टीईटी 2024 चे काय होणार, याबद्दल साशंकता होती. आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे यंदाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सुविधेसह परीक्षेबाबतचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे.
राज्यात शिक्षकांची 24 हजार पदे भरण्यात येणार असून, तशी घोषणाही झाली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली आहे. त्याविरोधात राज्यातील डी.एड., बी.एड.धारक उमेदवारांनी पुण्यात बेमुदत उपोषण केले होते. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली बिंदुनामावलीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यासाठी शिक्षण विभाग जबाबदार असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.