

नवी मुंबई : गणेशोत्सवात सोन्याला आलेली झळाळी पितृपक्षातही कायम असल्याचे चित्र आहे. सध्या दहा ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 13 हजार 400 रुपयांवर पोहोचला असून, ग्राहकाला जीएसटी आणि घडणावळीसह 1 लाख 26 हजार 802 रुपये मोजावे लागणार आहेत. एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची घडणावळ 1 हजार रुपये आकारली जाते, या हिशेबाने दहा ग्रॅम सोन्याची घडणावळ 10 हजार रुपये होते. या दहा ग्रॅमवर जीएसटी तीन टक्के म्हणजे 3,402 रुपये आकारला जातो.
गेल्या आठ दिवसांत सोने 5,562 रुपयांनी महाग झाले. मात्र, दर वाढूनही सोन्याच्या दागिन्यांची उलाढाल वाढतीच राहिली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.
सोने, चांदीच्या दरात वाढ होत असली, तरी त्याचा कुठलाही परिणाम सराफ बाजारात दिसून येत नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले. ग्राहक मोठ्या संख्येने सोने, चांदी खरेदी करत आहेत. ऑक्टोबरमध्ये दिवाळी आणि त्यानंतर येणार्या लग्नसराईसाठी काही कुटुंबांनी दागिन्यांच्या आगाऊ ऑर्डर दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.