

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईमध्ये शुक्रवारपासून कमाल तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुरुवारी मुंबईत ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. शुक्रवारपासून त्यात दोन अंशांनी वाढ होईल. शनिवारी पारा पस्तिशीवर पोहोचेल. रविवारी कमाल तापमान (३६ अंश सेल्सिअस) पस्तिशीपार जाण्याची शक्यता आहे. राज्यभरात उष्णतेची लाट असून, गुरुवारी यंदाचे सर्वोच्च ४२.२ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात नोंदवले गेले. ब्रह्मपुरी ४१.९, पुणे ४१.४, जळगाव ४०.४, मालेगाव ४०, परभणी ४०, बीड ४०, अमरावती ४०.४, बुलडाणा ३८.४, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३८.८, नागपूर ४०, वर्धा ४० या शहरांचा पारा चाळिशीत आहे.