

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर ह्या आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी स्वत: या संदर्भात एक्स पोस्टवरून माहिती दिली आहे.
आज सोमवारी (दि.१५) सकाळी १० वाजता दादर येथील भाजपचे कार्यालय वसंतस्मृती येथे तेजस्वीनी घोसाळकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थितीत होते.
गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर ह्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय घेतल्यामुळे ठाकरे गटाला निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा फटका बसणार आहे.
"नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत…वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही ! जय महाराष्ट्र" या पोस्टमधून त्यांची नाराजी आणि निर्णयामागील वेदना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.