

मुंबई : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना अनुदानाच्या वाढीव टप्प्यासंदर्भात 14 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाचे गेल्या 22 दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेले हुंकार आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर बुधवारी रात्री स्थगित करण्यात आले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी वाढीव 20 टक्के अनुदानाचा टप्पा तुमच्या पगारात जमा होईल, असा शब्द आंदोलनस्थळी येऊन दिला.
दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी येऊन शिक्षकांना पाठिंबा दर्शविला. यावेळी खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार उपस्थित होते.
राज्यात सुमारे 67 हजार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. यापूर्वी काहींना 20 टक्के अनुदान मिळत होते. अनुदानात वाढ होऊन काहींना 40 टक्के अनुदान मिळाले. वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा, यासाठी सातत्याने समन्वय संघाने आंदोलन, उपोषणे केली आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. महायुती सरकारने 14 ऑक्टोबर 2024 रोजी त्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने 18 जून 2025 पासून शिक्षकांनी येथील आझाद मैदानावर हुंकार आंदोलन सुरू केले होते.
गेले दोन दिवस या आंदोलनास्थळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे आंदोलनाची दखल महायुती सरकारला घ्यावी लागली. दरम्यान, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांना पाठिंबा दर्शविला. शासनाने शिक्षकांचा उचित सन्मान करावा, अशी अपेक्षा खा. पवार यांनी व्यक्त केली. तसेच, उद्धव ठाकरे यांनी आपण शिक्षकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.