

मुंबई : राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववीच्या लांबलेल्या वार्षिक परीक्षा अखेर शुक्रवारी संपल्या असून आता शिक्षकांना येत्या चार दिवसांत पेपर तपासण्याचे आव्हान असणार आहे. या चार दिवसांत सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक बनवून निकालपत्र बनवणे ही कामे करावी लागणार आहेत. यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाला निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची अंतिम लेखी परीक्षा घेतली जात असे. यंदा मात्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्याची पद्धत बंद करत राज्यातील परीक्षा एकाच वेळी घेण्याच्या सूचना दिल्या. एससीईआरटीने केलेल्या या बदलानुसार, राज्यभरातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी (पॅट) 8 ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्याची शाळांना सक्ती केली होती. तसेच या परीक्षांचा निकाल 1 मेपर्यंत लावण्याबाबतही एससीईआरटीने सूचना जाहीर केल्या. या सूचना आल्यानंतर शिक्षक संघटनांनी विरोध करण्याचा प्रयत्नही केला. पण शालेय शिक्षण विभागाने आपला हा निर्णय पुढे रेटत नव्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेतल्या.
वाढत्या तापमानात परीक्षांचे नियोजन केल्याने राज्यातील पालक चिंतेत होते. ही चिंता मिटली असून शनिवारपासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहेत. मात्र शिक्षकांना आणखी काही दिवस शाळेत यावे लागणार आहे. 1 मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना या दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांचे पेपर तपासावे लागणार आहेत आणि त्यांचे गुणपत्रक तयार करावे लागणार आहे. छोट्या शाळांना निकाल जाहीर करण्यात फार अडचण येणार नाही. पण मोठ्या आणि जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांची अग्निपरीक्षा असल्याचे या शाळांमधील शिक्षक सांगतात.
वार्षिक परीक्षांचा निकाल तयार झाल्यानंतर हा निकाल मुख्याध्यापकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतो. मंजुरी मिळाल्यानंतर निकाल जाहीर केला जातो. ही प्रक्रिया अत्यंत बारकाईने करावी लागते. पाच दिवसांत ही सर्व प्रक्रिया पार पाडताना शिक्षकांची मोठी दमछाक होणार आहे.
जून 2025 पासून सुरू होणार्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नवीन धोरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहेत. जून 2025 पासून सुरू होणार्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. याचीही तयारी शिक्षकांना आतापासून तयारी करावी लागणार आहे. पहिलीच्या नवीन शैक्षणिक पद्धतीत एनसीईआरटीच्या धर्तीवर समतोल, मूल्यमापन-आधारित आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला जाणार आहे. शाळेच्या वेळापत्रकात, विषय नियोजनात, मूल्यांकन पद्धतीत आणि परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहेत.