

पवन होन्याळकर
मुंबई : केंद्र सरकारच्या यू-डायस प्रणालीत राज्यातील लाखो विद्यार्थी आधार अपडेटपासून लांब असले तरी राज्यातील शिक्षकांचीही ‘आधार’ नोंदणी पूर्ण झालेली नाही. राज्यातील 7 लाख 34 हजार शिक्षकांपैकी 47 हजार शिक्षकांची अद्याप आधार पडताळणीच अर्धवट अवस्थेत आहे. यातील 31 हजार 397 शिक्षकांची पडताळणी थेट यूआयडीएआय कडून फेल झाली आहे, तर 15 हजार 636 शिक्षकांची प्रक्रिया प्रलंबित आहे.
पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती यू-डायसच्या माध्यमातून दरवर्षी मिळवली जाते. शालेय शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून वेळोवेळी यू-डायस प्लस प्रणालीमधे माहिती भरण्यासाठी वेळोवेळी आदेश शाळांना दिले जातात. सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, शिक्षक संख्या, पदे, रिक्त पदे विद्यार्थीसंख्या, पायाभूत सुविधांची माहिती, शाळेत मिळत असलेल्या सोयी-सुविधा आदी माहिती या माध्यमातून दरवर्षी एकत्रित केली जाते. यंदा शालेय शिक्षण विभागाने सरल नोंदणी बंद करून केंद्र सरकारच्या यू-डायस प्लस प्रणाली अंतर्गत तपशील एकत्र केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल नोंदणीबरोबरच शिक्षकांचीही डिजीटल नोंदणी केली जात आहे. यामध्ये यू-डायस प्रणालीत आता शिक्षकांचाही आधार क्रमांकाचीही नोंदणी केली जात आहे. राज्यातील हजारो शिक्षकांची नोंदणी आजही आधार पडताळणीविना अर्धवट स्थितीत आहे.
राज्यातील एकूण 7 लाख 34 हजार 61 शिक्षकांपैकी 47 हजार 33 शिक्षकांची आधार पडताळणी पूर्ण झालेली नाही. यामधील 31 हजार 397 शिक्षकांची आधार पडताळणी थेट यूआयडीएआय कडून फेल झाली असून, 15 हजार 636 शिक्षकांची पडताळणी अद्यापही अर्धवट प्रक्रियेत आहे. या आकडेवारीत सर्वाधिक शिक्षक हे 34 हजार 738 शिक्षक हे विनाअनुदानित (खासगी) शाळांमधील असल्याचे दिसून आले आहे. तर 6 हजार 678 शिक्षक अनुदानित शाळांमधील आहेत तर 5 हजार 617 शिक्षक शासकीय शाळातील आहेत. आधार पडताळणी नसलेल्या एकूण संख्येत 74 टक्क्यांहून अधिक शिक्षक खासगी संस्थांमधील असल्याचे दिसून आले आहे.
शासकीय शाळा : 5,617
अनुदानित शाळा : 6,678
विनाअनुदानित शाळा : 34,738
एकूण 47,033
राज्यात एकूण शिक्षक : 7,34,061