Naxalite leader Venugopal | जनतेला, केडरला खोटी आशा दाखवणे चूक होते; जगभरात सशस्त्र लढे अपयशी ठरताहेत

शरणागत माओवादी नक्षल नेता वेणुगोपाल ऊर्फ सोनूची कबुली
Naxalite leader Venugopal |
Naxalite leader Venugopal | जनतेला, केडरला खोटी आशा दाखवणे चूक होते; जगभरात सशस्त्र लढे अपयशी ठरताहेत
Published on: 
Updated on: 

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : जगभरात सशस्त्र उठाव अपयशी ठरत असल्याची कबुली देत, क्रांती आणि न्यायाच्या स्वप्नाने जनता व माओवादी केडरला आशा दाखवणे ही चूक होती, अशी स्पष्ट भूमिका माओवादी नेता एम. वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने मांडली आहे.

सोनूच्या आत्मसमर्पणाला १५ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. आत्मसमर्पणामागील कारणे विशद करणारे त्याने लिहिलेले पत्र दै. ‘पुढारी’च्या हाती आले आहे. सध्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात नोकरी करत असलेल्या सोनूने या लेखवजा पत्रात गेल्या वर्षीचा १५ ऑक्टोबर हा दिवस ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असल्याचे नमूद करत, अनेक दशकांच्या सशस्त्र संघर्षानंतर नव्या जगाकडे वळण्याचा निर्णय योग्य होता. मात्र, तो घेण्यास उशीर झाल्याची कबुली दिली आहे.

माझी पावले १५ ऑक्टोबरच्या दिवशी मुख्य प्रवाहाकडे वळली, असे नमूद करीत सुरुवात केलेल्या या पत्रात सोनू पुढे म्हणताे, सशस्त्र उठावाची शक्यता जंगलात आणि शहरांमध्येही लोप पावत चालली होती. खरे तर ज्या कारणांसाठी आमचा लढा होता, ती कारणे आणि त्यामागचे हेतूच कुठेतरी लोप पावत चालले होते. राजकीय भूमिका चुकत होती. त्यामुळे माझा निर्णय योग्य होता. तो मुख्य प्रवाहाकडे जाण्याचा होता. तो कसा योग्य होता हे गेल्या एक वर्षात मला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर लक्षात येते आहे. खरे तर शस्त्रे खाली ठेवायला उशीरच झाला होता; पण जे झाले ते योग्य झाले, असे आजच्या दिवशी मी नमूद करू इच्छितो आहे. आता खरे तर सगळे काही संपून गेल्यानंतर पक्षाला काय चुका झाल्या ते लक्षात घ्यायचे आहे काय, असा प्रश्नही पत्रात केला गेला आहे. तेलंगणामध्ये २०२० साली संघटनेतील भरती वाढत होती. त्यामुळेच सेंट्रल कमिटीला हा भाग गोरिला झोन असल्यासारखे वाटत होते. संघटनेत सक्रिय असलेल्या लोकांनी या सगळ्याची जबाबदारी घेणे आवश्यक होते.

नक्षलवादी चळवळीचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे पावले उचलत होती. उत्पात आणि रक्तपात त्यांना नको होता. नव्या पद्धतीने अशा परिस्थितीत आंदोलन उभारणे आवश्यक होते. परंतु, त्याही वेळी जेव्हा आता शस्त्रे खाली ठेवणे आवश्यक आहे असे मी सांगत होतो, त्या वेळेला माझ्या या भूमिकेची रेवडी उडवली जात होती. माझी भूमिका योग्य होती हे खरे तर आता तरी लक्षात आले असावे. राजकीय संघटनात्मक काम करणे जेव्हा अशक्य झाले होते तेव्हा चळवळीमध्ये वेगळेच लोक फिरत होते. खरेच हे सगळे चळवळ सुरू ठेवायला आवश्यक का वाटत होते, याचा विचार करायला हवा होता. ज्या चुका झाल्या त्या चुका दूर करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नव्हती. त्यामुळेच सशस्त्र क्रांतीचा बीमोड होतच होता. परंतु, चळवळ वेगळ्याच मार्गावर गेली होती. आज सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडून मी जो निर्णय घेतला, त्याला मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. लोकांचा मी आभारी आहे आणि सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडून वेगळ्या, माझ्या मार्गाला येणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या मोठी होते आहे याबद्दल मला आनंद आहे, असेही या पत्रात वेणुगोपाल याने लिहिले आहे.

या पत्रात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सेंट्रल कमिटीने तेलंगणा, वेस्टर्न घाट, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये संघटना वाढवायला सुरुवात केली होती. खरे तर ती सर्व क्षेत्रे म्हणजे संपूर्ण भारताचा महत्त्वाचा भाग होती, त्या संपूर्ण क्षेत्रात चळवळ सुरू झाली होती; पण वेगवेगळे लोक आमच्यात शिरत होते, ज्यांची संघटनेशी किंवा विचाराशी प्रतिबद्धता नव्हती. ज्या लोकांची भरती केली जात होती, त्या लोकांच्या आधाराने असा कोणताही लढा जिंकणे कठीण होते हे स्पष्टच होते. केवळ आणि केवळ स्वप्नातील गोष्टींवर अवास्तव विश्वास ठेवला जात होता. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात काव्य करणे, लेख लिहिणे सुरू होते. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा मोठी ठरत होती. चळवळ एकारलेली होती. परिस्थिती काय आहे ते लक्षात घेणे आवश्यक होते. ते लक्षात घेतले गेले नाही. त्यामुळेच पीछेहाट होत गेली. खरे तर हे चूक होते. कारण, भरती होणाऱ्या लोकांमध्ये गुणवत्ता नव्हती. केवळ संख्या वाढत होती. पार्टीने सदस्यत्वाचा आधार घेत जो काही चुकीचा निष्कर्ष काढला होता, तो फार धोक्याचा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news