

मुंबई : कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला खंडपीठाचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, सर्व बाबी तपासून याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयात आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात कोल्हापूर सर्किट बेंचला पूर्ण बेंचचा दर्जा द्या, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे केली आहे. त्याला उत्तर देताना सरन्यायाधीश बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आधी अवघा 9 टक्के असलेला महाराष्ट्राचा दोषसिद्धी दर आज 45 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो 60 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. कोल्हापूरच्या बहुप्रतीक्षित सर्किट बेंचला पूर्ण बेंचचा दर्जा मिळाला पाहिजे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्याय अधिक जलद आणि सुलभपणे मिळेल.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी न्याय, संविधान आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित भारताच्या न्यायव्यवस्थेचा गौरव केला. न्यायमूर्ती सूर्य कांत यांचे कार्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असून, सामान्य नागरिकांना न्यायाची ऊर्जा देणारे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
न्या. सूर्य कांत यांच्या न्यायनिष्ठेचे कौतुक
कलम 370 रद्द करण्याचा निर्णय, ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना, मतदारयाद्यांशी संबंधित महत्त्वाचे आदेश, महिलांसाठी आरक्षणासंदर्भातील निर्देश, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत दिलेले ठाम निर्णय यांचा उल्लेख करत त्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या न्यायनिष्ठेचे कौतुक केले. आपल्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक द़ृढ झाला आहे, असे शिंदे म्हणाले.
2022 पासून राज्यात 32 नवीन न्यायालये
राज्यातील न्यायव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना ते म्हणाले, 2022 पासून राज्यात 32 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली. त्यात 14 अतिरिक्त सत्र न्यायालयांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी नव्या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.