

Sunil Tatkare
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी विविध शासकीय महामंडळाच्या अध्यक्ष पदाचे वाटप होईल, अशी माहीती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
मागिल तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सत्तेच्या पदापासून वंचित आहेत. अशा कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी त्यांना ताकद देण्यासाठी महामंडळ वाटप होणे आवश्यक आहे. त्याबाबत महायुतीतील सर्वच पक्षात एकमत आहे. या महामंडळ वाटपाच्या दृष्टीने आतापर्यंत महायुतीतील घटक पक्षांच्या दोन बैठका पार पडल्या असून लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय होईल.
भाजपा, शिवसेना आणि आपला पक्ष स्थानिक निवडणुका एकत्र लढविणार का, या प्रश्नावर तटकरे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी चित्र वेगळे असते. स्थानिक निवडणुकीसाठी अनेकजण उत्सुक असतात. तसेच युतीमधील मित्र पक्षांची वेगवेगळ्या ठिकाणी ताकद असते. अशावेळी काही पक्ष स्वबळावर लढलेच तर निकालानंतर ते एकत्र येतील. यापूर्वीच्या काही स्थानिक निवडणुकीवेळी असे चित्र घडले होते. मात्र, आगामी निवडणुक एकत्र लढणार की स्वतंत्र, असे अद्याप काहीही ठरलेले नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही एकत्र बसणार आहोत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला महायुतीमध्ये घेणार का, असे विचारले असता तटकरे म्हणाले, महायुतीमधील भाजपा हा मोठा पक्ष आहे. याबाबत भाजपा निर्णय घेईल. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रीमंडळातील समावेश भाजप नेतृत्वाच्या माध्यमातून झाल्याबाबतच्या चुकीच्या चर्चा प्रसारमाध्यमातून सुरु आहेत. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय पूर्णपणे आमच्या पक्षाचा आहे. भुजबळ यांचा शपथविधी होण्याच्या एक आठवडा आधीच पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला होता, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.