Rajya Sabha Election | नवनीत राणा राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवार?

‘पुतण्याला मंत्री करा’; दिल्लीत जाण्यासाठी छगन भुजबळ यांची अट
Rajya Sabha Election |
Rajya Sabha Election | नवनीत राणा राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवार?
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने नवनीत राणा यांच्या नावाचा विचार करावा, असा प्रस्ताव पुढे आला आहे. शनिवारी पक्षातील सर्व बड्या नेत्यांनी बैठकीत अंतर्गत चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र आपले पुतणे समीर भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन करत असाल तरच आपण राज्य सोडून केंद्रात जायला तयार असल्याची अट छगन भुजबळ यांनी घातल्याचे समजते.

प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व नेते हजर होते. पार्थ पवार हे आज प्रथमच या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीला सुरुवातीपासून हजर राहिले असे समजते. भुजबळ यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्याची इच्छा अजित पवार यांच्या हयातीत व्यक्त केली होती. तोच धागा पकडत त्यांनी राज्यसभेत जाणे उत्तम ठरेल, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ठेवला. मात्र समीर भुजबळ या आपल्या पुतण्याला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावे. ओबीसी राजकारणाला वेग येणार असून ही मतपेटी शाबूत राहण्यासाठी मंत्रिमंडळात भुजबळांनी राहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले असे समजते.

मुंडे इच्छुक, पण चर्चा नाही

धनंजय मुंडे रिक्त होणाऱ्या या जागेसाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीबद्दल कोणतीही चर्चा या बैठकीत होऊ शकली नाही असे समजते.

नावाला भाजपची मान्यता हवी

मात्र भारतीय जनता पक्षाने या निर्णयाला मान्यता दिल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही माहीतगार नेत्यांनुसार अमरावती लोकसभेतील पराभूत उमेदवार नवनीत राणा यांचे नावही राज्यसभेसाठी पुढे आले आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्या दिल्लीला निवडून गेल्या होत्या. अजित पवार यांच्याशी राणा दाम्पत्याचे उत्तम संबंध होते. भारतीय जनता पक्षाने अमरावती जिल्ह्यातील राजकारण बाबतची राणा दांपत्याची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे पाठवला असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली फडणवीस यांची भेट

प्रफुल्ल पटेल यांच्याकडील बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला ‘वर्षा’वर गेली. या भेटीदरम्यान नवनीत राणा यांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही, तो आमच्यावर अन्याय असेल, असे स्पष्ट शब्दात सांगितले असल्याचे समजते. या संदर्भात भाजपने काय भूमिका घेतली आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र राज्यसभेची जागा ही एनडीए आघाडीच्या संमतीनेच ठरेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे केले जाते आहे.

अविनाश आदिक यांचे नाव आघाडीवर

भुजबळ यांचा हा प्रस्ताव मान्य न झाल्यास पर्यायी नावांचा विचार करताना अविनाश आदिक यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आले आहे. घराण्याचा वारसा असलेले अविनाश हे नावाजलेले ॲडव्होकेट आहेत. त्यांनी दिल्लीत जाणे पक्षाची बाजू मांडण्यासाठी उपयुक्त ठरेल. ते हिंदी इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषा उत्तमरीत्या बोलू शकतात, असेही चर्चेत आले.

राणा यांना लढायचेय अपक्ष

दरम्यान नवनीत राणा यांना स्वतःला हिंदुत्ववादी अजेंडा चालवायचा असल्याने त्यांना अपक्ष म्हणून लढायची इच्छा आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा असे त्यांना वाटते. यासंदर्भात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा झाली आहे का ते समजू शकत नाही.

सुनेत्रा पवार यांची पसंती वळसे यांना!

राज्यसभेच्या रिक्त जागेवर दिलीप वळसे पाटील यांची निवड व्हावी, अशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची इच्छा असल्याचे समजते. वळसे यांच्यासारखा नेता दिल्लीत पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकेल असे त्यांना वाटते. यासंदर्भात त्यांनी वळसे यांच्याशी संपर्क साधला असे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news