

Clash In Maharashtra Assembly Lobby
विधानभवनातील लॉबीमध्येच गुरुवारी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. या घटनेचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. ''ज्यांनी ही मारामारी केली त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. यावर जर निर्णय घेतला नाही तर भविष्यात आमदारांना बाहेर येऊन लोक मारु शकतात, याची नोंदी घ्यावी,'' असे मंत्री उदय सामंत सभागृहात बोलताना म्हणाले.
तर या घटनेवरुन, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही भाष्य केले. ''ज्या जागेवर मारामारी झाली तिथे स्मारक उभारा'', अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केली.
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, मी दुपारी दीड वाजता पुढची घोषणा करणार असल्याचे सांगितले.
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात बुधवारी वादावादी झाली. त्यानंतर आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात विधिमंडळ लॉबीत जोरदार हाणामारी झाली.
या मारहाणी प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना अटक करण्यात आली. दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दोघांच्याही विरोधात दाखल असलेल्या जुन्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी मागवली आहे.
गुरुवारी विधिमंडळ परिसरात रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आव्हाड यांचा कार्यकर्ता असलेल्या नितीन देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना आव्हाडांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी आव्हाडांना फरफटत नेत बाजूला करत कारवाई केली.